सुरक्षित मातृत्व अभियानात मेट्रो सिटींना मागे टाकत बीड अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:36 AM2018-01-15T00:36:51+5:302018-01-15T00:41:12+5:30
माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात पुणे, मंबई आणि औरंगाबादसारख्या मेट्रो सिटींना मागे टाकत बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. खाजगी डॉक्टरांच्या पुढाकारानेच हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात सध्या ६१ खाजगी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून ६ हाजर १२३ गर्भवती मातांची तपाणी करून उपचार केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात पुणे, मंबई आणि औरंगाबादसारख्या मेट्रो सिटींना मागे टाकत बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. खाजगी डॉक्टरांच्या पुढाकारानेच हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात सध्या ६१ खाजगी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून ६ हाजर १२३ गर्भवती मातांची तपाणी करून उपचार केले आहेत.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हाती घेण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याने गर्भवती मातांची उपचाराअभावी परवड होत होती. दुरवरून त्यांना जिल्हा रूग्णालय गाठावे लागत असे. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टरांना आवाहन करीत स्पवयंसेवक म्हणून सेवा देण्याची विनंती केली. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाल.
तब्बल ८१ डॉक्टरांनी यामध्ये नोंदणी केली. पैकी ६१ डॉक्टरांनी सेवा बजावली असून वेळेनुसार राहिलेले २० डॉक्टर सेवा देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बीडमध्ये पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे या अभियानाची सुरूवात झाली होती. ग्रामीण भागातील ६५ आरोग्य केंद्रामध्ये दोन महिन्यात ६१ डॉक्टरांनी ५४७ तास सेवा बजावत ६ हजार १२३ गर्भवती मातांची तपासणी केली आहे.
प्रत्येक गर्भवतीची एक सोनोग्राफी मोफत करून दिल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले. अभियान यशस्वीतेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
बीडच्या यशोगाथेचे पुण्यात कथन
नॉर्मल प्रसुती आणि सिझर करण्यातही बीड अव्वल राहिले आहे. बीडने कशाप्रकारे नियोजन करून परिश्रम घेतले, याची यशोगाथा २२ जानेवारी रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांना सांगण्यात येणार आहे. आरोग्य आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी डॉ.अशोक थोरात यांना याबाबत कळविलेही असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. या दोन अभियानात बीड अव्वल राहिल्याने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
१८ जिल्ह्यांची पाटी कोरीच
राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये या अभियानाकडे खाजगी स्त्रीरोग तज्ज्ञांनी दुर्लक्ष केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, परभणीचाही यामध्ये समावेश आहे. तर जालन्यात केवळ एक तर उस्मानाबादमध्ये ९ डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे.