ऐन दिवाळीत आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेंचा बीड दौरा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची उडाली झोप
By सोमनाथ खताळ | Published: October 21, 2022 07:11 PM2022-10-21T19:11:14+5:302022-10-21T19:11:54+5:30
तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या.
बीड : शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे २५ व २६ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ऐन दिवाळी त्यांनी आरोग्य संस्थांना भेटी देऊन, आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.
तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या. तसेच रात्री अचानक तपासणी करण्यासाठी राज्यभरात एकाचवेळी सुचना केल्या होत्या. बीडमध्येही चऱ्हाटा, नाळवंडी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यात डॉक्टर गैरहजर आढळले होते. त्यानंतर आयुक्तांनी सर्वच अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन रूग्णसेवा सुधारण्याबाबत सुचना केल्या होत्या. आता स्वत: तुकाराम मुंढे हेच ऐन दिवाळीत बीड दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात त्यांनी आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासह आढावा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खराब काम असणाऱ्या आरोग्य संस्थांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच धामधुम सुरू असतानाच आयुक्तांचा दौरा पडल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे.
जिल्हा रूग्णालयाचा घ्यावा आढावा
जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सुरेश साबळे यांची शुक्रवारी ऑर्डर निघाली. वर्षभरापासून तेच प्रभारी म्हणून काम पहात होते. ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालयांची माहिती घेतली असता दररोज सरासरी एकही प्रसुती होत नसल्याचे समोर आले होते. तसेच जिल्हा रूग्णालयात प्रवेश करताच नाकाला रूमाल लावावा लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता, रूग्णसेवेतील अनियमितता आदी समस्या येथे आहेत. अनेकदा औषधीही बाहेरून आणावी लागतात. या सर्वांची खात्री करण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी जिल्हा रूग्णालयाला भेट देऊन पाहणी तर करावीच, परंतू रूग्णांची संवाद साधून माहितीही घ्यावी, अशी मागणी सामान्यांमधून हाेत आहे.