बीडचे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 04:28 PM2019-11-28T16:28:04+5:302019-11-28T16:30:28+5:30
आजार, योजनांची डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दिली योग्य माहिती
बीड : आजार, योजना व इतर आरोग्य विषयक माहिती जिल्ह्यातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना देण्यात बीडचे जिल्हा प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यात अव्वल राहिले आहे. महाराष्ट्रातही पालघरनंतर बीडचा दुसरा क्रमांक आहे. नुकतीच आरोग्य विभागाने ही रँक जाहीर केले आहे.
बीडमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत जिल्हा व जिल्हा शल्य चिकित्सकांतर्गत रूग्णालयीन प्रशिक्षण अशी दोन केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये विविध २२ प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये नियमित लसीकरण, असंसर्गिक आजार, प्रसुती पश्चात संतती नियमन, नवजात शिशू सुरक्षा कार्यक्रम, स्तनपान व शिशु पोषणाचे महत्व, माता व बालकांच्या सेवा, राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम आदींचा समावेश असतो. प्रत्येक वर्षाला या केंद्रांना उद्दिष्ट दिले जाते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आर.ए.हुबेकर, डॉ.संतोष गुंजकर यांनी समन्वय ठेवून हे उद्दिष्टपूर्ती सहज पार केली आहे. बीडला ९५.९५ टक्के मिळाले असून महाराष्ट्रात दुसरा तर मराठवाड्यात हे केंद्र अव्वलस्थानी आहे. शाखा सदस्य, आर.वाय.कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, अभय भोकरे आदी टिम यासाठी परिश्रम घेत आहे.
यांना दिले जाते प्रशिक्षण
तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा सेविका आदींना केंद्रात विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
बीडनंतर औरंगाबादचा क्रमांक
मराठवाड्यात बीड अव्वल असून औरंगाबादचा दुसरा क्रमांक येतो. त्यानंतर लातूर, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबादचा क्रमांक येतो. सर्वात निच्चांक उस्मानाबादचा असून ३३ व्या स्थानी आहे.
रूग्णालयीनमध्ये पाचव्या स्थानी
जिल्हा प्रशिक्षणमध्ये बीड राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. तर रूग्णालयीनमध्ये पाचव्या स्थानी आहे. मराठवाड्यात लातूरनंतर बीडचा क्रमांक येतो. डॉ.ए.आर.हुबेकर याचे प्र्रमुख आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्कस यांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्ती केली आहे. ९५ टक्के गुण घेऊन अव्वल राहिल्याचा आनंद आहे. यात सातत्य ठेवून डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा कायम प्रयत्न असेल.
- डॉ.संतोष गुंजकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, बीड