बीड, तुळजापूरचे ‘सैराट’ जोडपे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:07 AM2019-02-01T01:07:57+5:302019-02-01T01:08:20+5:30

उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Beed, Tuljapur's 'Sarat' couple in custody | बीड, तुळजापूरचे ‘सैराट’ जोडपे ताब्यात

बीड, तुळजापूरचे ‘सैराट’ जोडपे ताब्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आष्टी आणि तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तुळजापूर आणि कर्जतमध्ये केली.
आष्टी तालुक्यातील कडा येथील मनाली (नाव बदललेले) हिला तिच्याच बहिणीचा दीर गणेश लक्ष्मण लोंढे (२२ रा.डिकसळ ता.कर्जत) याने पळवून नेले. ही घटना सप्टेंबर २०१७ रोजी घडली होती. आष्टी पोलिसांना याचा तपास न लागल्याने हे प्रकरण २६ जानेवारी २०१९ रोजी बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे आले.
कक्षाने अवघ्या चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. दोघांनाही मिरजगाव येथून ताब्यात घेतले. त्यांना आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, मनाली व गणेश हे सुरूवातीला पुण्यात राहिले. गणेश हा प्लंबरचे काम करीत होता. मात्र त्यावर त्यांचा खर्च भागला नाही. म्हणून ते मिरजगावला आले होते. हीच माहिती पोलिसांना मिळाली. बातमीदारामार्फत त्यांनी त्याच्या मित्राला गाठले. त्यांच्या माध्यमातून ते या जोडप्यापर्यंत पोहोचले.
रात्रीच्या वेळी जेवण सुरू असतानाच त्यांनी या जोडप्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, सफौ. शिवाजी भारती, प्रताप वाळके, सुरेखा उगले, सिंधू उगले, नीलावती खटाणे, मीना घोडके, शेख शमीम, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे आदींनी केली.
एप्रिल २०१८ रोजी तुळजापुरमध्ये शेजारीच राहणाऱ्या नंदिनीला (नाव बदललेले) महेश तुळशीराम लोंढे (२२) याने पळवून नेले होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा बीडच्या एएचटीयू विभागाकडे येताच त्यांनी याचा तपास लावला. तुळजापुरमधूनच नंदिनीची सुटका केली. मात्र महेशने अगोदरच पलायन केले. पीडितेला पोलीस, नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या गुन्ह्यात महेशच्या आई-वडिलांना अटक केली होती.

Web Title: Beed, Tuljapur's 'Sarat' couple in custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.