Beed: बीडजवळ दोन बस जाळल्या, महामार्गावर टायर जाळले, महामार्गावर वाहतूक विस्कळीत
By अनिल भंडारी | Published: October 28, 2023 11:15 PM2023-10-28T23:15:30+5:302023-10-28T23:15:42+5:30
Beed News: बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
बीड - बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान सुरक्षेच्या कारणावरून बीड येथून जाणाऱ्या आणि येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार बीड येथील बसस्थानकातून ८ वाजता नेहमीप्रमाणे कोल्हापूर बस (क्र. एमएच ०९ एफएल ००७५) मार्गस्थ झाली होती. दरम्यान आहेर वडगाव फाटा परिसरात जमावाने ही बस अडवून प्रवाशांना खाली उतरवून ती पेटवून देण्यात आली. ही बसचे संपूर्ण नुकसान झाले. याच दरम्यान मांजरसुंबा घाटात दुसऱ्या जमावाने अहमदपूर- छत्रपती संभाजी नगर बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतू बस न थांबल्याने ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामुळे बसच्या इंजिनने पेट घेतल्याचे समजते. या बसमधील प्रवासी तातडीने सुखरूपपणे बाहेर पडले. दोन्ही बसमधील प्रवाशांनी मिळेल त्या वाहनातून बीड गाठले. माहिती मिळताच बीड ग्रामीण व नेकनूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, एसटीचे अधिकारी तसेच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले. दरम्यान पीड येथू जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या असून आरक्षण केलेल्या प्रवाशांना रिफंड मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना रोडवर टायर जाळले
रात्री साडेआठ- नऊ वाजेच्या दरम्यान बीड बायपास महालक्ष्मी चौक तसेच धुळे- सोलपूर महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी टायर जाळले. त्यामुळे दोन्ही बाजुने एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. वाहतूक पोलिस तसेच पोलिस या ठिकाणी पोहचल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.