व्यापाऱ्याच्या खिशातून चोरले 2 लाख रुपये, बीडमधून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 07:19 PM2019-02-12T19:19:41+5:302019-02-12T19:19:48+5:30
मध्यवर्ती बस स्थानकातून एकोंडी येथे जाण्यासाठी पाथरी-अक्कलकोट बसमध्ये चढत असताना खिसेकापू चोराने एका व्यापा-याच्या पँटच्या खिशातील 2 लाख रुपये चोरून पोबारा केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील च-हाटा फाटा येथील दोन खिसेकापू चोरांना ताब्यात घेतले आहे.
लातूर : मध्यवर्ती बस स्थानकातून एकोंडी येथे जाण्यासाठी पाथरी-अक्कलकोट बसमध्ये चढत असताना खिसेकापू चोराने एका व्यापा-याच्या पँटच्या खिशातील 2 लाख रुपये चोरून पोबारा केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील च-हाटा फाटा येथील दोन खिसेकापू चोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील रोख रक्कम 1 लाख 60 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाइल असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उमरगा तालुक्यातील एकोंडी येथील आडत व्यापारी संतोष कल्लाप्पा दहिटणे हे शेतमाल विक्री करून 2 लाख रुपये रक्कम घेऊन मध्यवर्ती बस स्थानकात आले. एकोंडीकडे जाण्यासाठी पाथरी-अक्कलकोट बसमध्ये चढत असताना 23 जानेवारी 2019 रोजी अज्ञात चोरट्याने प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या उजव्या पँटच्या खिशात ठेवलेले 2 लाख रुपये चोरले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी तपास केला. बीड जिल्ह्यातील च-हाटा येथील चंद्रकांत लक्ष्मण गायकवाड (39), रामकृष्ण बबन जाधव या दोघांना या प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदर गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी 1 लाख 60 हजार रोख व गुन्ह्यात वापरलेला मोबाइल असा एकूण 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरील आरोपी अट्टल चोर असून, त्यांच्याकडून जिल्ह्यात तसेच अन्य जिल्ह्यात चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.