बीड : वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाज एकवटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:13 AM2019-08-29T00:13:46+5:302019-08-29T00:14:37+5:30
वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.
बीड : वंजारी समाजाला देण्यात आलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने वंजारी समाजातील नागरिक सहभागी झाले होते.
राज्यात वंजारी समाजाला एनटी.डी प्रवर्गातून २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे आरक्षण तोकडे आहे. त्यासाठी देखील समाजाला संघर्ष करावा लागला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात हे देण्यात आलेले २ टक्के आरक्षण कमी आहे. त्या तुलनेत विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक पात्रता अधिक आहे मात्र, आरक्षण कमी असल्यामुळे त्याचा फायदा होत नाही. तसेच खुल्या प्रवार्गात देखील प्रविष्ट होता येत नाही. त्यामुळे अनेक वेळा उच्च शिक्षणासाठी संधी समाजातील मुलांना मिळत नाही. वंजारी समाजाला वाढीव आरक्षण देण्याची मागणी आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी जिल्हाभरात समाजामध्ये जनजागृती करुन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले होते.
मंगळवारी काढण्यात आलेला मोर्चाबीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून निघाला होता. त्यानंतर सुभाष रोड मार्गे शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व समाजातील मुलींनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या व्यासपीठावर मुलींनी आरक्षणासंदर्भातील मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी वाढीव आरक्षणाची आवश्यकता का आहे, त्याचा समाजाला फायदा कसा होईल याविषयी माहिती दिली. तसेच शासनाने मागण्यांचा विचार करुन तात्काळ निर्णय घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
या आहेत प्रमुख मागण्या
जातनिहाय जनगणना करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, उद्योग व्यावसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध व्हावे, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यावस्था व्हावी यासाठी जिल्हानिहाय वसतीगृह व्हावेत, समाजासाठी कै. गोपीनाथराव मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे, मागासप्रवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुल्या प्रवर्गामध्ये सर्व स्तरावरील शिक्षणाची व नौकरीची संधी पुर्ववत मिळावी. या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत, त्याचा विचार शासनाने करावा व तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा राज्यात सर्व जिल्ह्यात मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार
वंजारी समाज हा कष्टकरी, शेतकरी व शेतमजुर तसेच उसतोड कामगार आहे. अजूनही समाजात शिक्षणाचे प्रमाण हवे त्या पटीत वाढलेले नाही. त्यामुळे वंजारी समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ शासनाने घ्यावा. अन्यथा राज्यभरात विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.