बीडला दिले केवळ २० डोस; पालकमंत्र्यांचं लक्ष कुठंय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:30+5:302021-04-17T04:33:30+5:30
बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिविर आणि कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच ...
बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनली असताना रेमडेसिविर आणि कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. अशातच राज्य सरकारने बीडला केवळ २० डोस दिले आहेत, यासंदर्भात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र पाठवून खेद व्यक्त केला आहे. दरम्यान, बीडमध्ये पालकमंत्र्यांना फक्त माफियांचे हित माहीत आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बीडमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ७२९ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर बाधितांची संख्या ३५ हजारांच्या आसपास गेली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करीत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.
लसीचे केवळ २० डोस ; पालकमंत्र्यांचं लक्ष कुठंय ?
---------------------
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आलेल्या २ लाख डोसपैकी बीडला इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत, ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठंय, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे डोस आणि इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.