बीडला मिळणार आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:23 AM2019-06-16T00:23:20+5:302019-06-16T00:24:31+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होत असून, संभाव्य मंत्र्यांमध्ये शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती निकटवर्तीयांनी दिली.
बीड : राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होत असून, संभाव्य मंत्र्यांमध्ये शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती निकटवर्तीयांनी दिली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन स्वीकारत चार वर्षे सत्तेविना गेलेली संधी पाचव्या वर्षी क्षीरसागर यांनी साधली आहे.
मागील सरकारच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांना सत्ता बदलानंतर विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, राष्ट्रवादीमध्ये त्यांची घुसमट झाली. परिणामी ठोस निर्णय घेत लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप - शिवसेना युतीचा प्रचार केला. निकालाच्या दोन दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी क्षीरसागर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा राजकीय निरिक्षकांमधून सुरु होती.
आठवडाभरापासून क्षीरसागर हे मुंबईतच तळ ठोकून होते. रविवारी क्षीरसागर यांचा शपथविधी होणार असल्याने नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह शेकडो समर्थक शनिवारीच मुंबईकडे रवाना झाले.
जिल्ह्याला आतापर्यंत एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. यावेळी मात्र आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद जिल्ह्याकडे येणार असल्याचा कयास कार्यकर्ते बांधत होते. क्षीरसागर यांच्या रुपाने शिवसेनेला जिल्ह्यात तगडे नेतृत्व मिळाले आहे. प्रदीर्घ काळाच्या राजकीय प्रभावामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.