बीडमध्ये होणार ‘मेट्रो ब्लड बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:40 AM2018-10-01T00:40:11+5:302018-10-01T00:41:18+5:30
‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या वाक्याचा प्रत्यय बीडमध्ये सर्वाधिक येतो. पूर्वी गैरसमजूतीमुळे रक्तदान करीत नव्हते, परंतु मागील काही वर्षांपासून रक्तदाते स्वत:हून पुढे येत असल्याने बीड जिल्ह्यात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त बॅगचे संकलन होत आहे. यामुळेच आता अत्याधुनिक सुविधायुक्त ‘मेट्रो ब्लड बँक’ उभारण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तीन महिन्यांपूर्वीच प्रस्तावही दाखल झाला आहे. यामुळे बीडची मान आणखी उंचावणार आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या वाक्याचा प्रत्यय बीडमध्ये सर्वाधिक येतो. पूर्वी गैरसमजूतीमुळे रक्तदान करीत नव्हते, परंतु मागील काही वर्षांपासून रक्तदाते स्वत:हून पुढे येत असल्याने बीड जिल्ह्यात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त बॅगचे संकलन होत आहे. यामुळेच आता अत्याधुनिक सुविधायुक्त ‘मेट्रो ब्लड बँक’ उभारण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तीन महिन्यांपूर्वीच प्रस्तावही दाखल झाला आहे. यामुळे बीडची मान आणखी उंचावणार आहे.
बीड जिल्हा रूग्णालय ३२० खाटांचे आहे. परंतु प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या तीप्पट आहे. यामध्ये गंभीर, अतिगंभीर, जर्जर, अपघात, प्रसुती आदी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दररोज रूग्णालयात जवळपास ३० ते ४० ब्लड बॅगची आवश्यकता भासत असते. एवढी मागणी असतानाही बीडच्या ब्लड बँकेत ठरावीक कालावधी सोडला तर तुटवडा जाणवत नाही. जर तुटवडा जाणवला तर तात्काळ संघटना, राजकीय पक्ष यांना आवाहन करून शिबीर घेण्यासंदर्भात कळविले जाते. तसेच काही लोक स्वत:हून पुढे येत रक्तदान करतात. यामुळे अनेकांना जीवदान मिळाल्याचे अनुभव आहेत.
दरम्यान, बीडची शासकीय रक्तपेढी रक्त संकलन करण्यात राज्यात अव्वल ठरत आहे. याबाबत येथील पथकाचा गौरवही झालेला आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखीनच वाढला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतिष हरीदास, डॉ. आय. व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त संक्रमण अधिकारी डॉ. भगवान मेथे, डॉ. संतोष कदम, डॉ. जयश्री बांगर, एस. एम. भांडवलकर, गणेश बांगर, आर. एस. खेडकर, महादेव येवले, आशा केकाण, बिभीषण मात्रे, नरसिंग कोंकाडे, संतोष राऊत, दिलीप औसरमल, प्रकाश मस्के, प्रशांत सुकाळे ही टीम येथे कार्यरत आहे.
काय फरक आहे या बँकेत ?
४मेट्रो ब्लड बँकमध्ये रक्त दिल्यावर त्यातील प्लेटलेट काढून घेत पुन्हा दात्याला रक्त परत करता येणार आहे.
४तसेच मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच अत्याधुनिक सुविधा आणि तात्काळ सेवा मिळणार आहे.
४रक्तावर तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून ते संबंधित रूग्णाला मिळणार आहे. पूर्वी साधी ब्लड बँक असताना अनंत अडचणी येत होत्या.
४तसेच पूर्वीच्या ब्लड बँकेपेक्षा दुपटीची जागा वाढविण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय इमारत रिकामी करण्यात आली आहे.
४विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने शिबिरांमुळे रक्तदात्यांची वाढ होत आहे.त्यामुळे जास्त प्रमाणात रक्त साठविणे सुलभ होणार आहे.
प्रत्येक महिन्याला हजार बॅगचे संकलन
४जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत प्रत्येक महिन्याला एक हजारपेक्षा जास्त रक्ताच्या बॅगचे संकलन केले जाते. गतवर्षी १४ हजार बॅग जमा केल्या होत्या. यावर्षी आतापर्यंत ९ हजारापेक्षा जास्त बॅगचे संकलन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
कांबळेंचे प्रत्येक ३ महिन्यांनी रक्तदान
बीडमधील सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे हे प्रत्येक तीन महिन्याला रक्तदान करतात. आतापर्यंत त्यांनी ६४ वेळा रक्तदान केल्याचे सांगण्यात आले. तरूण कार्यकर्त्याने समाजासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. यासंदर्भात त्यांचा अनेकवेळा गौरवही झाला आहे. रक्तदान केल्यानंतर मनाला समाधान मिळत असल्याचे कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
......
१० हजारपेक्षा जास्त ब्लड बॅगचे संकलन होत असल्याने मेट्रो ब्लड बँकसाठी ३ महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दाखल केला आहे. कामाच्या आॅर्डर देखील दिल्या आहेत. अत्याधुनिक सुविधांबरोबरच तात्काळ सेवा मिळतील. गतवर्षी रक्त संकलनात बीड ब्लड बँक प्रथम होती. यावर्षी देखील त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. दात्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे.
- डॉ.अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड