बीडच्या युवकाचा पुढाकार; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयाशी करणार प्रेमविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 12:34 PM2022-02-23T12:34:31+5:302022-02-23T12:37:46+5:30
तृतीयपंथीय सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी
बीड : समाजात नेहमीच हिणवल्या जाणाऱ्या तृतीयपंथीयाशी विवाह करण्यासाठी, बीडमधील एक तरुण पुढे आलाय. मागील अडीच वर्षांपासून किन्नर सपना आणि बाळू रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतलाय.
बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं आणि तब्बल अडीच वर्ष लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय. रुसव्या फुग्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झालीय.समाजात आजही या घटकाला स्वीकारण्यासाठी नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्यासमोर निर्माण झाला. चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला आहे.
याआधी मनमाड मध्ये तृतीय शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते. या विवाहानंतर मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. या घटकाला देखील समाजात मान सन्मानान देण्यात यावा, अशी भावना व्यक्त केली जातेय. त्यामुळे स्वतःहून जर असे विवाह इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.