बीड जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी राकाँच्या उमेदवारांना सर्वाधिक मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 07:20 PM2020-01-04T19:20:32+5:302020-01-04T19:23:06+5:30
१३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करू नका, अशा हायकोर्टाच्या आदेशानुसार निकाल घोषित करण्यात आला नाही.
बीड : बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी शनिवारी मतदान झाले. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शिवकन्या सिरसाट यांना ३२ तर भाजपाच्या डॉ. योगिनी थोरात यांना २१ मते पडली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ३२ तर भाजपाचे भारत काळे यांना २१ मते मिळाली. १३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करू नका, अशा हायकोर्टाच्या आदेशानुसार निकाल घोषित करण्यात आला नाही.
बीड जिल्हा परिषदेत महाआघाडीचे संख्याबळ अधिक होते. या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काकू-नाना आघाडी, शिवसेना आणि काँग्रेस अशी आघाडी झाली होती. गतवेळेस भाजपासोबत असलेली शिवसेना यावेळी महाआघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिली. भाजपाचे ३ सदस्य तर काँग्रेसचा १ सदस्य फुटला. गतनिवडणुकीत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ सदस्यांनी पक्षादेश डावलून भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करुन मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. या सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करुन आपणास मतदानाचा अधिकार मिळावा, अशी विनंती केली होती. या संदर्भात खंडपीठाने १३ जानेवारीपर्यंत निकाल घोषित करू नये, असे आदेश दिल्यामुळे मतदान होऊनही निकाल घोषित झाला नाही.
पंकजा मुंडे परदेशात
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची महत्त्वाची निवड होत असताना पंकजा मुंडे ह्या परदेशात होत्या. त्यांनी ही जबाबदारी खा.डॉ.प्रीतम मुंडेवर सोपवली होती. परंतु, मागच्या निवडीप्रमाणे कुणीही प्रयत्न केला नाही. इच्छा असूनही शिवसेनेच्या चार सदस्यांना आमच्या सोबत येता आले नाही. लोकशाही प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, शिवसेना ही महाआघाडीसोबत गेल्यामुळे बाकी निकाल स्पष्ट आहे,असे टिष्ट्वट करून पंकजा मुंडे यांनी आधीच आपला पराभव मान्य केला होता.
तेव्हाच भाजपाचा पराभव झाला
६० सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे फक्त १९ सदस्य निवडून आले होते तेव्हाच भाजपाचा पराभव झाला होता. बहुमतासाठी एक मत कमी असताना तोडफोड करून भाजपाने पहिल्या टर्ममध्ये सत्ता हस्तगत केली होती, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची महत्त्वाची निवड होत असताना भाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या परदेशात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.