बीडमध्ये भाजपासाठी चुरशीची लढाई, पण अमेरिकेत गेल्यात पंकजाताई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:04 PM2020-01-04T13:04:35+5:302020-01-04T13:36:15+5:30
आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १९, कॉँग्रेस ३, भाजपा १९, शिवसंग्रामचे ४, शिवसेनेचे ४, काकू - नाना आघाडीचे २, अपक्ष २ असे बलाबल आहे.
बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात दुपारी सभा होत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास (महिला) प्रवर्गासाठी आहे. निकाल कळायला १३ जानेवारी उजाडणार आहे. शनिवारी मतदान होणार असले तरी कुणाच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांची माळ पडली हे हायकोर्टाच्या आदेशामुळे १३ जानेवारीनंतरच कळणार आहे.
महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून विरोधकांच्या संख्याबळासच सुरुंग लावला असल्याचे सुत्राने सांगितले. संख्याबळ आमच्याकडे असल्याचे आघाडीतर्फे सांगण्यात येत आहे. कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा परिषद निवडणुकीत आमचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, दुसरीडे पंकजा मुंडेंनी निवडणुकीची जबाबदारी खासदार प्रितम मुंडेंवर सोपवली असून त्या विदेशात गेल्या आहेत.
मोर्चेबांधणी : राजकीय हालचालींना वेग
राज्यातील सत्तांतरानंतर बीड जिल्हा परिषदेतील घडामोडींबद्दल उत्सुकता लागली आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या जिल्हा परिषदेवर ताबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या बैठकीत राजकीय खलबते झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीस मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, संजय दौंड, राजेसाहेब देशमुख व इतर नेते उपस्थित होते. तर, माजी मंत्री बदामराव पंडितही या बैठकीला होते, अशी माहिती मिळाली आहे. दुसरीकडे सहलीवर गेलेले भाजप गटाचे सदस्य रात्री बीडमध्ये पोहचले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर राजेंद्र म्हस्के, रमेश आडस्कर, प्रीतम मुंडे यांच्याकडे जबाबदारी असून पंकजा मुंडे आज येणार अशी माहिती होती, पण त्या आल्या नाहीत. या सगळ्या घडामोडींमध्ये सुरेश धसही कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे भाजपाने निवडणुकीत औपचारिकताच ठेवली की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरसट, सोळंके यांची नावे चर्चेत
राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी घाटनांदूर गटातील शिवकन्या शिरसट तर उपाध्यक्ष पदासाठी तेलगाव गटातून जयसिंह सोळंके यांची नावे चर्चेत आहेत. मात्र भाजपच्या वतीने रात्री उशिरापर्यंत कोणाचेच नाव पुढे आलेले नव्हते. शिवसेनेकडे ४ सदस्य असल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या सदस्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.
५३ सदस्य करणार निवड
जिल्हा परिषदेतील ६० पैकी पाच सदस्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन सदस्य कमी झाले आहेत. त्यामुळे ५३ सदस्यांतून निवडणूक होईल.
शिवसंग्रामचा व्हिप
आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे १९, कॉँग्रेस ३, भाजपा १९, शिवसंग्रामचे ४, शिवसेनेचे ४, काकू - नाना आघाडीचे २, अपक्ष २ असे बलाबल आहे. शिवसंग्रामचे चारही सदस्य सध्या भाजपवासी आहेत. शिवसंग्रामकडे आता एकही सदस्य नसताना मात्र तटस्थ राहण्याबाबत व्हिप जारी केला आहे.
आम्ही महाआघाडीसोबत
मागच्या वेळी भाजपासोबत असणारे काँग्रेसचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्याशी चर्चा केली असता काँग्रेसचे तीनही सदस्य महाआघाडी सोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. आमच्या नेत्या रजनीताई पाटील यांनी आम्हाला तसा आदेश दिला आहे. मुंबईत बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, रजनीताई पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली त्यात आम्हाला महाआघाडीसोबत राहण्याचा आदेश आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
निवडणूक कार्यक्रम
दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत सभेच्या स्थळी नामनिर्देशपत्र स्वीकारण्यात येणार आहे. २ वाजता विशेष सभेला प्रारंभ होईल. २ ते २.३० या वेळेत नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. २.४५ पर्यंत वैध उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. नंतर नामनिर्देशनपत्र माघार घेण्यासाठी ३ वाजेपर्यंत वेळ दिला जाईल. आवश्यकता भासल्यास मतदान, असा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून प्रविणकुमार धरमकर हे काम पाहणार आहेत.
निकाल १३ जानेवारीला
खंडपीठाने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या पाच अपात्र सदस्यांना मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. हा आदेश कायम असल्यामुळे त्या पाच अपात्र सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून याचिका दाखल केली होती. यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल १३ जानेवारी २०२० पर्यंत जाहीर करू नये, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी गुरुवारी दिलेला आहे.