बीड जिल्हा परिषदेच्या सत्तेतून शिवसंग्राम पडणार बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:50 PM2018-12-16T23:50:42+5:302018-12-16T23:52:17+5:30
जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीड जिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहून काही उपयोग नाही. आमच्या लोकांना फूस लावून फक्त त्यांचंच भलं होत असेल तर अशा सत्तेत राहून उपयोग नसल्याने बीडजिल्हा परिषदच्या सत्तेमधून बाहेर पडण्याचा निर्णय आ.विनायक मेटे यांनी जाहीर केला. तर महायुतीमध्ये राहण्याचा निर्णय ६ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे घेण्यात येणाऱ्या निर्धार मेळाव्यात घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारणी मेळाव्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आ.मेटे यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. भारती लव्हेकर, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रभाकर कोलंगडे, उदय आहेर, अविनाश खापे, जि.प.सदस्य अशोक लोढा, संदीप पाटील, दिलीप माने यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी आ.मेटे म्हणाले स्व.गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दामुळे शिवसंग्राम पक्ष महायुतीमध्ये सहभागी झाला होता. मात्र त्यावेळी दिलेली आश्वासने पाळण्यात आली नाहीत.
इतर पक्षांप्रमाणे आम्हाला न्याय मिळाला नाही. तरीही आम्ही भाजपासोबत आहोत, तरी देखील दखल घेतली जात नसल्याने नाराज असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काळात भाजपसोबत महायुतीत राहण्याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन बीड जिल्हा परिषदमध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी देखील आम्ही केलेल्या मागणीप्रमाणे पदे मिळाली नाहीत, तसेच सदस्यांना योग्य वागणूक दिली जात नाही. अपमानित केले जाते.विकास निधीची योग्यरित्या वाटप होत नाही. अपेक्षाभंग झाल्याचे सांगून मेटे म्हणाले, हे वागणं म्हणजे भाजपचे मैत्रीचे लक्षण दिसत नाहीत. त्यामुळे जि. प. च्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसंग्राम प्रदेशाध्यक्षांनी घेतल्याचे मेटे म्हणाले. दरम्यान या निर्णयानंतर मात्र राजकीय समीकरणांवर चर्चा सुरु झाली.
पंकजा मुंडेंनी भेट टाळली
जिल्हापरिषदेच्या मुद्द्यावर पत्रपरिषदेत आ. मेटे म्हणाले, पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी शिवसंग्रामच्या सर्व सदस्यांना मुंबईत बोलावले होते. त्यानंतर जि.प. च्या विषयावर बोलण्यासाठी वेळ देखील ठरली होती मात्र, पंकजा मुंडे यांनी भेट घेणे टाळल्याचा आरोप आ.मेटे यांनी यावेळी केला.
मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव
शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारणी मेळाव्यात विविध ठराव घेण्यात आले. यामध्ये यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा आरक्षण न्यायालयामध्ये टिकवण्याचे काम सर्वस्वी राज्य सरकारचे आहे. तसेच शेतकरी निवृत्ती, बेरोजगार, नदीजोड तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात ठराव घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा देखील ठराव यावेळी मांडण्यात आला. अभिनंदनाच्या ठरावाबाबत मेटे यांना ही दुट्टपी भूमिका नाही का असे पत्रकारपरिषदेत विचारले असता, घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करणे चुकीचे नसल्याचे मेटे म्हणाले.
काय होईल याचा परिणाम ?
बीड जिल्हा परिषदमध्ये आ. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाचे ४ सदस्य निवडून आलेले आहेत.
त्यापैकी जि. प. उपाध्यक्षा जयश्री मस्के या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपसोबतच राहतील.
त्यामुळे तीन सदस्यांनी पाठिंबा काढून घेतला तरी देखील ३१ इतके संख्याबळ भाजपकडे राहणार आहे.
प्रसंग पडला तर इतर राजकीय पक्षांचे गट सोबत घेऊन जिल्हा परिषदेत नवे समीकरण भाजप तयार करु शकते.
मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर होणाºया निर्णयाकडे लक्ष लागले आहे.