बीड जि.प.चे अनफिट कर्मचारी जाणार घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:53 PM2018-04-09T23:53:10+5:302018-04-10T10:37:28+5:30
बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अमोल येडगे यांनी शिक्षण विभागातील स्वच्छता मोहीम सुरु केली होती. कक्ष अधिकाºयाची बदली करुन धमाका केला होता. त्यानंतर हंगामी वसतिगृहांची तपासणीची महत्वाची मोहीम राबवून सरकारी निधीचा गैरवापर करणा-यांना धक्का दिला.
इतर विभागातील प्रशसकीय कार्यवाहीला वेग आणण्याचा प्रयत्न केलेला असतानाच आता शिक्षण विभागातील ५५ वर्षांवरील तसेच ३० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या जि. प. कर्मचाºयांच्या कामाचा आढावा तसेच गोपनीय अहवालाची तपासणी करण्याबाबत आदेशित केले आहे.
या कर्मचा-यांची सेवेत राहण्याची पात्रता आजमाविण्याच्या संबंधात पुनर्विलोकन करण्यात येत आहे. या अंतर्गत कर्मचाºयाची शारीरिक क्षमता, सचोटी आदींची माहिती घेतली जात आहे.जिल्ह्यातील ११ गटशिक्षणाधिकारी तसेच जि. प. माध्यमिक शाळांच्या वर्ग २ च्या मुख्याध्यापकांना या संदर्भात माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
या मोहिमेंतर्गत वर्ग- ३ आणि वर्ग -४ च्या कर्मचाºयांच्या कामकाजाचा आढावा घेवून तसेच त्यांचे गोपनीय अहवाल तपासून यापुढे ते शासकीय सेवा बजावण्यास सक्षम आहेत की नाहीत याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिका-यांपुढे सादर होणार आहे.
सर्व शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, केंद्र प्रमुख, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वर्ग ३ चे मुख्याध्यापक, शारीरिक, चित्रकला, प्रयोगशाळा सहायक, माध्यमिक शिक्षकांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच शासन पातळीवर देखील वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाºयांचीही तपासणी होणार असल्याचे वृत्त आहे.
अनेक कर्मचारी ताळ्यावर येणार
प्रशासकीय पातळीवर कामकाजाला गती आणण्यासाठी क्षमता तपासणी मोहीम हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. अनेक कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर राहतात, कार्यालयीन व शालेय पातळीवर कामचुकारपणा तसेच गैरवर्तन करताना आढळून येतात. काही कर्मचारी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा करतात. वरिष्ठांच्या सूचनांचे अनुपालन टाळतात असे कर्मचारी या मोहिमुळे ताळ्यावर येणार आहेत.