दीड महिन्यापासून बीडकर अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:56 AM2019-01-14T00:56:22+5:302019-01-14T00:57:56+5:30
मागील अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेने महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेने महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपये आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यांपासून शहरातील अनेक रस्त्यावरील पथदिवे बंद करण्यात आलेले आहेत. तसेच न.प.कडून देखील याची दखल न घेता वीज बिल न भरले जात नाही. त्यामुळे बीडकर मात्र अंधारात आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शहरातील पथदिव्यांसाठी वापरलेल्या विजेचे बिल न.प.कडे मागील अनेक वर्षांपासून थकित आहे. यासंदर्भात महावितरणकडून वेळोवेळी नगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, तोडगा निघत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात एलईडी पथदिवे बसविले आहेत. मात्र, वीज खंडित असल्यामुळे एलईडी पथदिवे हे शोभेची वस्तू झाली आहे. पथदिवे सुरु करण्यासाठी नगरपालिका व महावितरणच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून तोडगा काढावा असा प्रस्ताव महावितरणचे अधीक्षक अभियंता बी. एस. निर्मळ यांनी न.प.कडे दिला आहे. मात्र, नगरपालिकेचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पथदिवे बंद यासंदर्भात न.प.चे मुख्याधिकारी अधिकारी धनंजय जावळीकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांना मात्र याविषयी गांभिर्य असल्याचे दिसून आले नाही. दोन्ही विभागाने तोडगा काढून तात्काळ पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.