बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:58 PM2019-11-09T23:58:36+5:302019-11-09T23:59:49+5:30
अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला.
बीड : अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. दरम्यान निकालाच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात शनिवारी निकाल लागला. दरम्यान हा निकाल सर्व पक्षकारांची बाजू ऐकून सर्वोच्च न्यायालायने दिला आहे. त्यामुळे याचा सर्वांनी आदर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विविध माध्यमांद्वारे केले होते. तसेच कायदा आणि सुव्यवस्था रहावी यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवली होती. सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी विविध धर्मियांच्या धर्मगुरु व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच शांतता समितीच्या बैठकांचे आयोजन प्रत्येक ठाण्यांतर्गत करण्यात आले होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासंदर्भातसमाजामध्ये संदेश पोहचवण्यात आला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वच शहरांमध्ये रोजच्या प्रमाणेच वातावरण होते. याचे कुठेही कसलेही पडसाद उमटले नाहीत. याउलट नागरिकांनी रोजच्याप्रमाणे बाजारपेठा खुल्या ठेवल्या होत्या. नागरिकांचीही वर्दळ होती. अशा प्रकारे जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश दिला.
दरम्यान पुढील काळात देखील खबरदारी म्हणून जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त कायम राहणार आहे. तसेच सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पेव फुटू नये यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिनला नोटिस देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बीडकरांच्या भूमिकेचे स्वागत-आस्तिककुमार पाण्डेय
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनी स्वागत केले आहे. सलोखा राखत निकालाचा आदर करणे गरजेचे आहे. दोन्ही पक्षातील नागरिकांनी शांतता ठेवत एकमेकांचा आदर करावा. आपण बीडचे भूमिपूत्र आहोत. त्यामुळे आपल्याला सदैव सोबत रहावे लागणार आहे. तसेच शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बीडकरांनी सौहार्दपूर्ण भूमिका घेत त्याचे स्वागत केले. याबद्दल सर्व जनतेचे अभिनंदन करतो. तसेच पुढील काळात प्रशासनास सहकार्य करून शांतीपूर्ण वातावरण कायम ठेवावे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त कायम ठेवलेला आहे. कोणत्याही अफवेला नागरिकांनी बळी पडू नये, तसेच जाणून बुजून शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षक पोद्दार यांची ‘चाय पे चर्चा’
शनिवारी निकाल लागल्यानंतर शहरात सर्वत्र शांततेचे वातावरण होते. तरी देखील नागरिकांमध्ये जाऊन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शहरातील मोमीन पुरा, बालेपीर, बशिरगंज, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर यासह विविध ठिकाणी चहाच्या स्टॉलवर चहाचा स्वाद घेत नागरिकांशी सुसंवाद केला. यावेळी विविध विषयांवर चर्चा करत नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी ‘सामाजिक सलोखा कायम राखला जाईल, असे नागरिकांमधून सांगण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक यांनी नगारिकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत केलेल्या‘चाय पे चर्चा’चे सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे.