अखेर बीडकरांचे स्वप्न साकार झाले; आष्टी-नगर रेल्वेसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन
By अनिल लगड | Published: September 23, 2022 02:29 PM2022-09-23T14:29:06+5:302022-09-23T14:32:02+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला आष्टी-नगर रेल्वेला हिरवा झेंडा
आष्टी ( बीड ): बीड जिल्हावासियांचे अनेक वर्षांचे रेल्वे सेवेचे स्वप्न अखेर आज साकार झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यू आष्टी-अहमदनगर रेल्वेसेवेस आज दुपारी हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले.
आष्टी येथून सुटणाऱ्या पहिल्या डेमू पॅसेंजर ट्रेनला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच पहिल्या न्यू आष्टी ते अहमदनगर टप्प्यातील ६६ किलोमीटरची ब्रॉडगेज लाईन प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गावर सहा स्थानके आहेत. आठवड्यात रविवार सोडून सहा दिवस रेल्वे या मार्गावर धावेल.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बीडचे नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न आज साकार होतेय. आजचा दिवस आनंदाचा आहे. आज बीडमध्ये रेल्वे धावतेय. यात सर्वात जास्त पुढाकार मुंडे यांचा आहे. मागील पाच वर्षे मी सत्तेत असताना या कामाचा आढावा घेत होतो. आता आपले सरकार आहे. आता राज्य सरकार डबल इंजिनने काम करत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी न्यू आष्टी रेल्वे स्थानकावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, भीमराव धोंडे, शिवाजी कर्डीले, आ.बाळासाहेब आजबे, आ. नमिता मुंदडा, आ.लक्ष्मण पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांची भाषणे
स्व. गोपीनाथ मुंडे यांचा पहिला प्रश्न असायचा : रावसाहेब दानवे
आज खूप आनंद झाला आहे. मराठवाडा, विदर्भ मागास भाग आहे. यासाठी फडणवीस यांनी मागे जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. बीडच्या रेल्वेसाठी स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा पहिला प्रश्न असायचा. आता मार्च 2023 पर्यंत ही रेल्वे बीडला नेणार आहोत. तसेच वंदे भारत ट्रेनचे लातूर कारखान्यात काम चालू आहे, असेही दानवे म्हणाले
गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार - खा. प्रीतम मुंडे
पाच दशके रेल्वेची वाट पहात होता. त्या रेल्वेचे स्वागत. स्व. गोपीनाथ मुंढे यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले. महाविकास आघाडीने ४०० कोटी थकविले. आता या सराकरने २४२ कोटी दिले आहेत. यावरच भागणार नाही. ही रेल्वे आष्टीवरून परळी आणि मुंबईला गेली तरच बीड जिल्ह्याचा विकास होणार आहे, असेही खा. मुंडे म्हणाल्या.
...म्हणून बीड जिल्हा शांत आहे: पंकजा मुंडे
या प्रसंगी आज जो माणूस पाहिजे ते गोपीनाथ मुंढे साहेब रेल्वेचा झेंडा दाखवायला नाहीत. म्हणून आज बीड जिल्हा शांत आहे. ही रेल्वे जेंव्हा धडघडणार तेव्हा स्व. मुंडे यांचे नाव प्रत्येकाच्या ह्रदयात धडधडणार आहे. ही रेल्वे कोण्या एका पक्षाची नाही. पण खरे श्रेय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे आहे.
फडणवीस, मुंडे भगिनींनी पाठपुरावा केला: राधाकृष्ण विखे
स्व. मुंडे यांचे आज स्वप्न आज साकार होतेय. आज मुंडे साहेब असायला हवे होते. फडणवीस, मुंडे भगिनींनी पाठपुरावा केला. त्याला यश आले. नगरच्या विकासात बीडचा मोठा वाटा आहे. ही रेल्वे परळीपर्यंत जावी. पंतप्रधान मोदींचे सरकार जनतेच्या मनातील आहे. फडणवीस यांची मेहनत मोठी आहे. नगर- बीड पुन्हा जोडला जातोय.
रेल्वे मार्गाची थोडक्यात माहिती:
२६१ किलोमीटर - अहमदनगर- बीड- परळी नवीन ब्रॉडगेज लाइन रेल्वेमार्ग
६६ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम आतापर्यंत झाले
१९५ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम होणे बाकी
३५४ कोटी -- मंजूर झाले त्यावेळची प्रकल्पाची किंमत
४८०५ कोटी- नवीन ब्रॉडगेज लाइन प्रकल्पाची अंदाजे किंमत
५० टक्के वाटा- भारत सरकार
५० टक्के वाटा- राज्य सरकार
१७ मोठे पूल- या रेल्वेमार्गावर
६३ लहान पूल- या रेल्वे मार्गावर आहेत.
३४ रस्ते- पुलाखालील आहेत.
१२ रस्ते - पुलावरील आहेत