कनकालेश्वर महोत्सवात नृत्य, संगीत आणि हास्य मैफिलीला बीडकरांची दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:25 AM2019-04-08T00:25:59+5:302019-04-08T00:26:22+5:30
संस्कार भारती बीड आयोजित २३ वा कनकालेश्वर महोत्सवात उत्साहात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नृत्यांगना केतकी नेवपूरकर आणि ध्यास परफॉरमिंग अकॅडमीच्या नृत्यांगनानी सादर केलेले समूह भरतनाट्यम आणि बासरीवादक निरंजन भालेराव यांच्या हंसध्वनी आणि पहाडी रागाच्या सादरीकरण व हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी केलेल्या दिग्गज नेत्यांच्या नकलांना उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली, संस्कार भारती बीड आयोजित २३ वा कनकालेश्वर महोत्सवात उत्साहात पार पडला.
यावेळी प्राचार्या डॉ. दीपा भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते आणि संस्कार भारतीचे देवगिरी प्रांताध्यक्ष भरत लोळगे , प्रांत महामंत्री सुधीर कुलकर्णी, महेश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी ७ वाजता कनकालेश्वर मोहोत्सवाचा दीप प्रज्वलित करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. क्षीरसागर म्हणाल्या कनकालेश्वर महोत्सवाने बीडचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात सर्वदूर पोहचवले आहे.
कलावंतांनी एकाच वेळी मंदिराच्या जलाशयातील तरंगत्या रंगमंचावर आणि मंदिराच्या ओट्यावरील रंगमंचावर आपले नृत्य आणि बासरी वादन सादर केले.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद वझे, सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले. प्रारंभी विनया हसेगावकर आणि संचाने संस्कार भारती गीत सादर केले. भरत लोळगे यांनी कनकालेश्वर मंदिराचे शिल्प गीत गाऊन नववर्षाचे स्वागत केले. उपस्थित रसिकांनी कनकालेश्वरावर पुष्पवृष्टी केली.
केतकी नेवपूरकर आणि त्यांच्या नृत्यसमूहाने शिवआराधना, गौरीशंकर पूजन या नृत्याचे आणि वंदे मातरम् या राष्ट्रगीतावर आधारित आगळेवेगळे नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. बासरी वादक निरंजन भालेराव यांनी अद्धा तीनतालात राग हंसध्वनी सादर केला तेव्हा श्रोते सुरांवर डोलायला लागले ,त्यानी तरंगत्या रंगमंचावरून पहाडी रागातील धून सादर केली त्याला रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट पसंती दिली ,त्यांना तबल्यावर सुधांशु वेताळ तर बासरीवादन निलेश देशपांडे आणि देवांग उमरीकर यांनी केले.
यावेळी हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी त्यांचा २०४८ वा प्रयोग कनकालेश्वर महोत्सवात सादर केला. विविध बोलीतील वैशिष्ट्य, माणसांचे स्वभाव आणि राजकीय नेत्यांच्या नकला सादर करून त्यांनी श्रोत्यांना खळाळून हसवले. कार्यक्रमास बीडकरांची मोठी गर्दी होती.