बीडकरांचा हिरमोड; इंजिन चाचणीनंतर उद्या धावणारी नगर- आष्टी हायस्पीड रेल्वे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 07:14 PM2021-12-16T19:14:57+5:302021-12-16T19:17:13+5:30
पुढच्या आठवड्यात २१ किंवा २२ तारखेला हि हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कडा ( बीड ) : अनेक वर्षांपासून बीड जिल्हावासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रेल्वेचे स्वप्न आता दृष्टीक्षेपात येत आहे. गेली अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा नगर ते आष्टी रेल्वेमार्गावरील दोन वेळच्या इंजिन चाचणीमुळे लवकरच पूर्ण होणार असे चित्र आहे. परंतु, उद्या या मार्गावरून धावणारी हायस्पीड रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने जिल्हावासियांचा हिरमोड झाला आहे.
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नगर ते आष्टी या मार्गावर रेल्वे इंजिन चाचणीसाठी फिरत होते, पण रेल्वे कधी धावणार? अशी उत्सुकता सर्वांना असताना आता मुहूर्त ठरला आहे. हायस्पीड रेल्वे येत्या १७ डिसेंबरला अहमदनगर ते आष्टी अशी धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, आज काही तांत्रिक अडचणीमुळे उद्या धावणारी हायस्पीड रेल्वे रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे. नमानालाच विघ्न आल्याने मात्र जिल्हावासीयांचा पुरता हिरमोड झाला आहे. दरम्यान, पुढच्या आठवड्यात २१ किंवा २२ तारखेला हि हायस्पीड रेल्वे धावणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वरिष्ठ अधिकारी मुंबईवरून येणार होते
रेल्वे सुरक्षा आयोगाचे मनोज अरोरा, मुख्य अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता (बांधकाम नगर), विजयकुमार राय, सोलापूरचे चंद्रभागा सिंग, अहमदनगर येथील रेल्वे अधिकारी एस. सुरेश यांच्या उपस्थितीत सोलापूरवाडी ते आष्टी मार्गावर झालेल्या कामाचे उद्घाटन होणार होते.