बीडच्या अट्टल गुन्हेगाराची हर्सुल कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 07:36 PM2019-06-10T19:36:49+5:302019-06-10T19:37:12+5:30
सय्यद नासेर सय्यद नूर (रा.बांगर नाला, बालेपीर बीड) असे स्थानबद्द केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बीड : अवैधरित्या शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, खूनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बीडमधील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी ही कारवाई केली.
सय्यद नासेर सय्यद नूर (रा.बांगर नाला, बालेपीर बीड) असे स्थानबद्द केलेल्या आरोपीचे नाव आहे. सय्यद नासेर याच्याविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर ठाण्यासह परळी शहर आणि सदरबाजार जालना या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. शिवाय हा आरोपी बीड शहर व इतर परिसरात गुंडगिरी, चोऱ्या व दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करीत होता. त्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. ७ सप्टेंबर २०१८ रोजी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी सय्यद नासेर विरुद्ध एमपीडीए कायद्यातंर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता.
या प्रकरणात १५ सप्टेंबर २०१८ रोजी तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी एम.डी.सिंह यांनी सुनावणी करुन स्थानबद्धतेचे आदेश दिले होते. मात्र तेंव्हापासून आरोपी फरार होता. त्यास सोमवारी पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक जी.श्रीधर, अ.पो.अ.विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कर सावंत, स्था.गु.शा.चे. निरीक्षक घनशाम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.