बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
By सोमनाथ खताळ | Updated: April 23, 2025 18:09 IST2025-04-23T18:07:43+5:302025-04-23T18:09:45+5:30
सामाजिक कार्याचा वसा असलेली बीडची लेक पुजा मोरे (जाधव) ही आपले पती धनंजय जाधव यांच्यासमवेत लग्नानंतर पहिल्यांदाच काश्मिरमध्ये गेले; मात्र, हल्ल्यानंतर परिस्थिती पाहून ते दोघेही अडचणीत सापडलेल्या पर्यटकांच्या मदतीला धावले

बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
बीड : मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम अग्रेसर असणारी बीडचे लेक पुजा मोरे (जाधव) ही आपले पती धनंजय जाधव यांच्यासमवेत लग्नानंतर पहिल्यांदाच काश्मिर गेली. श्रीनगरमध्ये उतरताच काही तासांनी पहलगाम भागात दहशतवादी हल्याची वार्ता पसरली. त्यानंतर घाबरलेल्या महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांना मदतीसाठी लेक पुजा अन् जावई धनंजय धावले. बुधवारी काश्मीरच्या लाल चौकात तिने दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केले.
पुजा ही मुळची गेवराईची रहिवाशी. पुण्याचे धनंजय जाधव यांच्यासोबत २३ मार्च रोजी तिचा विवाह झाला. त्यानंतर ते ९ दिवसांसाठी मंगळवारी काश्मिरसाठी रवाना झाले. सकाळी साडे नऊ वाजता श्रीनगर विमानतळावर पोहचले. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांना दहशतवादी हल्याची बातमी समजली आणि सर्वांचीच धावपळ झाल्याची दिसली. यावर घाबरलेल्या परंतू महाराष्ट्रातील आपल्या माणसांना मदत करण्यासाठी लेक आणि जावई दोघही सरसावले. काश्मीरमधील आर्मी कॅम्पमध्ये राहून त्यांनी काही पर्यटकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचे पती धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाच वेळा संपर्क करून पर्यटकांशी बोलणेही करून दिले. मंगळवारीही त्यांच्याकडून मदत सुरूच होती.
शवपेट्या पाहून अश्रु अनावर
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवादी हल्यात मयत झालेल्या पर्यटकांना आर्मीच्या कॅम्पमध्ये आणले जात होते. त्यांच्या शवपेट्या पाहून पुजा आणि धनंजय यांना आश्रू अनावर झाले. नातेवाईकांचा हंबरडा काळजाला धडकी भरविणारा होता, असेही पुजा सांगतात.
रूग्णालयात जावून मदत
बुधवारी सकाळीच पुजा व धनंजय यांनी आर्मी कॅम्पमधील रूग्णलयात जावून जखमी लोकांची भेट घेतली. त्यांच्या नातेवाईकांशी आपल्या फोनवरून महाराष्ट्रात बोलणे करून दिले. जखमींच्या नातेवाईकांनीही आपले काेणी तरी मदतीला आल्याचे पाहून हंबरडा फोडला.
९ दिवस थांबून मदत करणार
आम्ही तसे तर हनिमुनसाठी आलो होतो. परंतू आता अशी दुर्दैवी घटना घडल्याने आम्ही कसलाही आनंद व्यक्त न करता नऊ दिवस थांबून सर्वांना मदत करणार आहोत. माझे पती धनंजय हे मुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत. तसेच आमचा नंबरही दिला असून २०० पेक्षा जास्त पर्यटकांनी आम्हाला संपर्क केला आहे.
लेक, जावयाचे आंदोलन
हनिमुनसाठी गेलेल्या पुजा व धनंजय जाधव यांनी बुधवारी सकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने काश्मीर भागातील लाल चौकात आंदोलन केले. दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.