बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बॅँक अधिका-यांना सुनावले ; पाच बैठका झाल्या, पीक कर्जवाटपात दिरंगाई का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:27 AM2018-06-21T00:27:57+5:302018-06-21T00:27:57+5:30
बीड जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे लक्षांक २११६ कोटी रुपये असून बॅँकांकडून आतापर्यंत ८५.८६ कोटी रुपये वाटप केले आहे. हे कर्जवाटप असमाधानकारक असून यात दिरंगाई का, अशी विचारणा करतानाच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सर्व बॅँकांना दिले.
बीड : पीककर्ज वाटप अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व बँकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. यासाठी सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयकांच्या आतापर्यंत ५ बैठका घेण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे लक्षांक २११६ कोटी रुपये असून बॅँकांकडून आतापर्यंत ८५.८६ कोटी रुपये वाटप केले आहे. हे कर्जवाटप असमाधानकारक असून यात दिरंगाई का, अशी विचारणा करतानाच पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावे असे आदेश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सर्व बॅँकांना दिले.
खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे, निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, एस बी आय बँकेचे डी.जी.एम. सी.एस.राणा, रिझर्व्ह बँकेचे ए.जी.एम मनोज कुमार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था, महसूल संघटनेचे पदाधिकारी व सर्व राष्ट्रीयीकृत, ग्रामीण खाजगी बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
बँक शाखांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी जिल्हयातील सर्व बँकांच्या प्रत्येक शाखेस एक नोडल आॅफीसर नियुक्त केलेले आहेत. तसेच ज्या बँकांकडे कर्मचारी संख्या कमी आहे तेथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी, सहकार विभागाचे कर्मचारी व गटसचिव बँकेत थांबून बँकेस आवश्यक ती मदत करण्यास तयार असून देखील पीक कर्ज वाटपास गती का मिळत नाही, अशा शब्दात जिल्हाधिकाºयांनी विचारणा केली.
जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी नवीन कर्ज घेण्यास पात्र झालेले आहेत. संबंधित बँकांनी कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना नवीन कर्ज मंजूर करावे. बँकांनी पीक कर्ज वाटपाबाबत बँकेकडे असलेल्या गावामध्ये जाऊन कर्ज मेळावे आयोजित करावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी यावेळी दिल्या.
कर्ज मंजुरी, वाटप तसेच लक्षांक पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, दररोज किती शेतक-यांना कर्जवाटप करणार व त्यानुसार किती तारखेपर्यंत लक्षांक पूर्ण होईल इ. कर्ज वाटपाची माहिती आॅनलाईन गुगल स्प्रेड शीटवर दररोज दिली पाहिजे अशा जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्व बँकांना दिल्या.
यावेळी जिल्हा उपनिबंधक एस पी बडे यांनी तालुकास्तरीय समिती स्थापनेचा आदेश, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे लक्षांक इतर बॅकांना वर्ग केल्याचे आदेश, जिल्ह्यातील अधिकाºयांची पीक कर्ज वाटपासाठी संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश इत्यादींची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे एजीएम मनोजकुमार यांनी बँकांनी कर्जवाटप गतिमान करणे आवश्यक असल्याचे सांगीतले.
बॅँकांना तंबी : खाते वर्ग करू
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पीक विमा, मुद्रा योजना इत्यादी योजनांचा आढावा घेतला.
ज्या बँका त्यांना दिलेला पीक कर्ज वाटपाचा लक्षांक मुदतीत पूर्ण करणार नाही त्या बँकांमधील सरकारी खाती महाराष्ट्र ग्रामीण बँकेत वर्ग करणार येणार असल्याची माहितीही यावेळी दिली. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांना लक्षांक वाटप करून शाखानिहाय कर्जवाटपाचे दैनंदिन नियोजन करावे व दररोज झालेल्या कर्जवाटपाचे शाखानिहाय अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याबाबत सर्व बँकांच्या जिल्हा समन्वयक यांना निर्देश देण्यात आले.
अनेक बॅँकांकडून कर्ज घेणारे होणार उघड
यावेळी अनेक बँकांकडून कर्ज घेतलेले शेतकºयांबाबत एस.बी.आय गेवराईचे शाखाधिकाºयांनी मुद्दा उपस्थित केल्यावर अशा शेतक-यांची यादी बँकांनी नोटीस बोर्डवर डकवावी अशी सूचना यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँक अधिकाºयांनी संनियंत्रण अधिकारी व बँकर्स यांच्यामध्ये योग्य ते समन्वय राखून कामकाज करण्याबाबत, तालुकास्तरीय सभा दर शुक्रवारी न चुकता आयोजित करणे तसेच सर्व तहसीलदारांनी प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या.
व्हिडिओ व्हायरलमुळे अडचणी
यावेळी बँक आॅफ बडोदा बँकेचे जिल्हा समन्वयक यांनी सद्यस्थितीत शासन २०१७ अखेर सरसकट कर्जमाफी देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे व त्यामुळेच शेतकरी सभासदांना कर्जवाटप होण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगितले. यावेळी एस बी आय बँकेचे डी.जी.एम. सी.एस राणा यांनी बँकेच्या वतीने प्रशासनाचे सहकार्याने कर्जवाटपातील अडचणी दूर करून जास्तीत जास्त कर्जवाटप करण्याची हमी दिली.