बीडच्या ‘डीएसबी’चा कारभार ढेपाळला; जिल्ह्यातील विविध आंदोलनाची माहितीच अद्यावत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 03:48 PM2019-03-14T15:48:43+5:302019-03-14T15:50:15+5:30
कारभार सुधारण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वारंवार सुचना केल्या
बीड : जिल्ह्यात कोठे काय चालते आणि काय होणार, याची सर्वात आगोदर जिल्हा विशेष शाखेला (डीएसबी) माहिती असणे अपेक्षित आहे. मात्र बीडची शाखा याला अपवाद आहे. येथील कारभार पूर्णपणे ढेपाळला असून २०१८ मध्ये किती आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे झाली, याची माहितीच त्यांच्याकडे ‘अपडेट’ नसल्याचे समोर आले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्हा विशेष शाखा वादग्रस्त ठरू पहात आहे. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बिघडलेला संवाद आणि सर्व माहिती अपडेट न ठेवणे यामुळे येथील कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. हा कारभार सुधारण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वारंवार सुचना केल्या, मात्र येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर याचा कसलाच परीणाम झालेला नाही. आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही, अशा अविर्भावात येथील अधिकारी, कर्मचारी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, २०१८ या वर्षात किती आंदोलने, मोर्चे, उपोषणे, रास्ता रोको झाले याची माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती देण्यासंदर्भात अधीक्षक जी.श्रीधर यांनी आदेशही दिले होते. मात्र आठवडा उलटल्यानंतरही डीएसबीत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे येथील कारभार कशाप्रकार चालतो, हे स्पष्ट होते.
अधीक्षकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष
आंदोलने, मोर्चे, उपोषणांची माहिती अधीक्षक जी.श्रीधर यांना मागितल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत मानकर यांना आदेश दिले. तब्बल आठवडा उलटल्यानंतरही या शाखेला माहिती काढता आली नाही. त्यामुळे डीएसबीकडून अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे दिसून येत आहे.
माहिती काढणे सुरू आहे. किचकट माहिती आहे. लवकरच उपलब्ध करून देऊ.
- हेमंत मानकर, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा