बीडचा अट्टल गुन्हेगार अशपाकची हर्सूल कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:07 PM2018-10-02T15:07:23+5:302018-10-02T15:09:33+5:30
अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.
बीड : घरफोड्या, चोऱ्या करण्यात तरबेज असलेल्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश काढले आहेत. आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे.
शेख अशपाक शेख आसेफ (३७ रा.मोहंमदीया कॉलनी, बीड) असे या आरोपीचे नाव आहे. अशपाकविरोधात बीड शहर, पेठबीड, शिवाजीनगर या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, जुलमाने घेणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे, दरोड्याच्या टोळीत सदस्य असणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची बीड शहरात सर्वत्र दशहत होती. हाच धागा पकडून पेठबीड ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एस.बडे यांनी त्याच्या एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. याला मंजूरी मिळताच अशपाकला बुलडाणा पोलिसांच्या ताब्यातून घेतले. त्याच्यावर कारवाई करून त्याची हर्सूलमध्ये रवानगी केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपधअीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बडे, सपोनि उदावंत यांनी केली.