बीडचे नवे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 04:19 PM2019-03-09T16:19:28+5:302019-03-09T16:19:59+5:30
निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच आहे
बीड : निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच आहे. आता बीडला विजय व्यंकटराव कबाडे हे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून येणार आहेत. तसेच आष्टी व बीड उपविभागातही नवीन अधिकाऱ्यांची नियूक्ती केली आहे.
लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी आणि निवडणूक आयोगाच्या नियमानूसार राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यामध्ये बीडचे यापूर्वीचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची चंद्रपुरला बदली झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यांच्या जागेवर बारामतीहून संदीप पखाले यांची नियूक्ती करण्यात आली होती. मात्र आता यामध्ये बदल करून विजय कबाडे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. कबाडे हे भारत राखीव बटालीयन, गट क्र. १३ वडसा-देसाईगंज, नागपूर कॅम्प येथे कार्यरत होते. पदोन्नतीने ते बीडला आले आहेत. तसेच आष्टी उपविभागाचे पदही रिक्त होते. या जागेवर आता विजय लगारे हे येणार आहेत.
तसेच बीडचे उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांचीही नांदेर येथील राज्य गुप्त वार्ता विभागात बदली करण्यात आली आहे. या जागेवर आता बीडचेच मुख्यालयाच ेउपअधीक्षक भास्कर सावंत यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सावंत यांनी काही महिने माजलगावचाही पदभार स्विकारला होता. दरम्यान, बीडला अपर पोलीस अधीक्षक राहिलेले वैभव कलुबर्मे यांची लोहमार्ग, औरंगाबादला अधीक्षक म्हणून नियूक्ती केली आहे.
खिरडकर नांदेडहून जालन्याला
बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांची नांदेडला राज्य गुप्त वार्ता विभागात बदली झाली होती. ती रद्द झाली असून ते जालन्याला जाणार आहेत.