बीडच्या खाजगी डॉक्टरांचे ‘दातृत्व’ राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:22 AM2018-09-27T00:22:51+5:302018-09-27T00:23:26+5:30
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. बीडची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात बीडच्या डॉक्टरांचे दातृत्व अनमोल राहिले आहे. या अभियानात राज्यातील ६९९ पैकी एकट्या बीडमधील तब्बल १०२ खाजगी डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. वर्षभरात तब्बल ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले आहेत. बीडची ही कामगिरी राज्यात अव्वल आहे.
माता मृत्यूदर कमी होऊन मुलींचा जन्मदर वाढावा, या उद्देशाने प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आरोग्य विभागाने सुरू केले. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे अभियान हाती घेण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची संख्या अपुरी असल्याने गर्भवती मातांची उपचाराअभावी परवड होत होती. दुरवरून त्यांना जिल्हा रूग्णालय गाठावे लागत असे. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने खाजगी डॉक्टरांना आवाहन करीत स्पवयंसेवक म्हणून सेवा देण्याची विनंती केली. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद बीड जिल्ह्यात मिळाला.
शासकीय रुग्णालयातील प्रसुतीत बीड तिसऱ्या क्रमांकावर
४पूर्वी शासकीय रूग्णालयात प्रसुती करण्यास महिला पुढे येत नव्हत्या. परंतु या अभियानामुळे महिलांमध्ये जनजागृतीबरोबरच योग्य उपचार होत आहेत. त्यामुळे महिला शासकीय रूग्णालयात जावून प्रसुती करून घेतात.
४पूर्वी हे प्रमाण जवळपास ५० टक्यापर्यंत होते. आता ते ८४ टक्यांवर पोहचले आहे. नंदुरबार, गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यांनतर बीडचा तिसरा क्रमांक लागतो.
जिल्ह्यात ७० ठिकाणी डॉक्टर करतात तपासणी
४राज्यात एकूण ६९९ खाजगी डॉक्टरांपैकी एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल १०२ डॉक्टर हे कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला हे डॉक्टर नियुक्त केलेल्या ७० ठिकाणी जावून गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी व इतर उपचार करतात.
४११ महिन्यात ६० हजार ३४३ गरोदर मातांची तपासणी केली असून पैकी १०७२ माता अति जोखमीच्या असल्याचे समोर आले आहे. अभियान यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
माता मृत्यू रोखण्यात यश; दर शून्यावर नेण्यासाठी प्रयत्न
२०१६-१७ मध्ये २३ मातांचा मृत्यू झाला. २०१७-१८ मध्ये ते १२ वर आले. सध्या मागील सहा महिन्यात केवळ तीन मातांचा मृत्यू झाला आहे. यावरून माता मृत्यू दर कमी करण्यातही आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसते. मृत्यू दर शुन्यावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ.थोरात यांनी सांगितले.
....
अभियान यशस्वी करण्यासाठी १०२ खाजगी डॉक्टरांकडून खूप मोठे सहकार्य मिळत आहे. सर्वसामान्यांना तत्पर, तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याला यश मिळत आहे. खाजगी डॉक्टर, जिल्हा रूग्णालय टिम, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांची टिम यासाठी परिश्रम घेत आहेत. यामुळेच हे शक्य होत आहे.
- डॉ.अशोक थोरात
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड