बीडच्या शिवसेना जिल्हाप्रमुखास मारहाणीची अफवा; दोघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:41 PM2019-04-09T23:41:57+5:302019-04-09T23:42:36+5:30
तालुक्यातील चौसाळा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मारहाण झाल्याची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे दोघांना चांगलेच अंगलट आले आहे.
बीड : तालुक्यातील चौसाळा येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना मारहाण झाल्याची खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणे दोघांना चांगलेच अंगलट आले आहे. हा सर्व प्रकार खोटा असून माझी मोठी बदनामी झाली आहे, असे म्हणत त्यांच्याविरोधात खांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रमोदबंटी धन्वे व राहुल कदम अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी कुंडलिक खांडे हे प्रचारासाठी चौसाळा सर्कलमध्ये गेले होते. याच दरम्यान, त्यांना मारहाण झाली, अशी खोटी पोस्ट धन्वे व कदम यांनी सोशल मीडियावर टाकली. यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला. खांडे यांना अनेकांचे फोन गेले. त्यामुळे ते सुद्धा घाबरले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हा सर्व प्रकार खोटा असल्याचे स्पष्ट केले. रात्री खांडे यांनी फिर्याद दिल्यावर यावर शिक्कामोर्तब झाले. पोनि शिवलाल पुर्भे, सपोनि महेश टाक यांच्याकडून याचा तपास केला जात आहे.
दरम्यान, यातील प्रमोद धन्वे याला बीड शहरातील चक्रधरनगर भागामधून गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पो. नि. पुर्भे चौकशी करीत होते.
पत्रकारांवरही नजर
खांडे यांना मारहाण झाल्याची पोस्ट व्हायरल झाल्यावर काही पत्रकारांनीही खात्री न करता ती व्हायरल केली. त्यामुळेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे या पत्रकारांवरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अफवा पसरवणाऱ्या पत्रकारांचेही धाबे दणाणले आहेत.