बीडमध्ये पत्नीसह तिच्या प्रियकराला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:54 AM2018-04-26T00:54:23+5:302018-04-26T00:54:23+5:30
प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी व प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा येथील तदर्थ सत्र न्यायालयाने (क्र. २) सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी व प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा येथील तदर्थ सत्र न्यायालयाने (क्र. २) सुनावली. बीड तालुक्यातील बेलुरा येथे २३ मे २०१४ रोजी खुनाचा हा गुन्हा घडला होता.
बेलुरा येथील आशा तुकाराम पांचाळ नामक महिलेचे नवगण राजुरी येथील बाळासाहेब वैद्य नामक इसमाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात आशाचा पती अडसर ठरत होता. त्यामुळे २३ मे २०१४ रोजी पहाटेच्या दरम्यान तुकाराम याचा गळा आवळून खून करण्यात आला. तुकारामच्या मृत्यूनंतर हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगून नवगण राजुरी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तुकारामच्या गळ्यावरील व्रण पाहून तो मृत असल्याचे सांगून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. परंतु, डॉक्टरांचा सल्ला न ऐकता हा मृतदेह तसाच परत बेलुरा येथे नेला गेला. दरम्यान गावच्या पोलीस पाटलाने याबाबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याला खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी बेलुरा येथे येऊन शवविच्छेदनासाठी मृतदेह बीड येथे जिल्हा रुग्णालयात नेला.
तुकारामचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला, या शवविच्छेदन अहवालानुसार आशा पांचाळ आणि बाळासाहेब वैद्य यांच्याविरुध्द खून करणे तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक फुले यांनी केला. त्यानंतर हे प्रकरण तदर्थ सत्र न्यायालय क्रमांक २ येथे दाखल केले.
परिस्थितीजन्य पुराव्याआधारे तदर्थ सत्र न्या. नाजेरा एस. शेख यांनी आशा पांचाळ व बाळासाहेब वैद्य यांना दोषी ठरवून दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. मिलींद वाघिरकर यांनी काम पाहिले. या निकालाकडे नवगण राजुरीसह बेलुरा परिसरातील जनतेचे लक्ष लागले होते.
या प्रकरणात २३ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर काही परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्यात आले. यात आशा, बाळासाहेब यांच्या फोन कॉल रेकॉर्डचा समावेश होता. दोघे शिर्डी येथे एका लॉजमध्ये राहिल्याचे तपासात समोर आले होते.