बीडला ‘क्रीडा’ कार्यालयात टक्केवारीचा रंगायचा ‘खेळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:51 PM2018-04-03T23:51:58+5:302018-04-03T23:51:58+5:30
बीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे रूजू झाल्यापासून पूर्णपणे ढेपाळला आहे. खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना येथे कसल्याच सुविधा नाहीत. संकुलाची अक्षरश: वाट लावली आहे. असे असतानाही मात्र व्यायामशाळा व विविध योजनांसाठी समोरच्या व्यक्तीकडून ‘टक्केवारी’ने पैसे वसुल करण्यास येथील अधिकारी प्राधान्य देत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशीच टक्केवारी घेणाऱ्या दोन अधिका-यांची ‘विकेट’ घेण्यात बीड लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे रूजू झाल्यापासून पूर्णपणे ढेपाळला आहे. खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना येथे कसल्याच सुविधा नाहीत. संकुलाची अक्षरश: वाट लावली आहे. असे असतानाही मात्र व्यायामशाळा व विविध योजनांसाठी समोरच्या व्यक्तीकडून ‘टक्केवारी’ने पैसे वसुल करण्यास येथील अधिकारी प्राधान्य देत असल्याचे सिद्ध झाले आहे. अशीच टक्केवारी घेणाऱ्या दोन अधिका-यांची ‘विकेट’ घेण्यात बीड लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. अशा या अधिका-यांमुळेच बीडमध्ये नवे खेळाडू घडत नसल्याचे दिसते.
बीड शहरात एकमेव असे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे. येथे शहराच्या कानाकोपºयासह विविध स्पर्धांसाठी राज्यातील खेळाडू येतात. येथे आल्यानंतर खेळाडूंना किमान मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. परंतु असे येथे काहीच नाही. गत वर्षात नंदा खुरपुडे हिने बीडच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाचा पदभार स्वीकारला. महिला अधिकारी असल्याने महिला खेळाडूंसाठी काही तरी चांगल्या सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा बीडकरांना होती. परंतु या अपेक्षांवर पूर्णत: पाणी फेरले गेले. खेळाडूंना सुविधा तर दूरच; परंतु येथे येणा-या सर्वसामान्य नागरिकांसह खेळाडू, क्रीडाप्रेमींना अरेरावी व उर्मट भाषेचा सामना करावा लागला.
खुरपुडेबाईच्या त्रासाला बीड शहरातील खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी जनता वैतागली होती. परंतु सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी करूनही तिची बदली होत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता.
अखेर मंगळवारी दुपारी कार्यालयातील शिपाई फईम शेख याच्यामार्फत ८० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी नंदा खुरपुडे हिच्यावर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीने केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर क्रीडा क्षेत्रात चर्चा रंगली होती.
‘लोकमत’ने गैरकारभार आणला चव्हाट्यावर
कार्यालयातील गैरकारभार व क्रीडा संकुलाची दुरवस्था, अपुºया सुविधा वारंवार वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्या होत्या. याची गंभीर दखल घेत क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर हे २१ डिसेंबर २०१७ रोजी बीडमध्ये आले होते. त्यानंतर क्रीडा कार्यालयाचा कारभार व संकुल सुस्थितीत आणण्यासाठी खुरपुडे हिला आठ दिवसांची मुदत दिली होती. परंतु तिच्या कारभारात काही सुधारणा दिसून आली नाही. आजही संकुलाची अवस्था बकाल आहे.
खेळाडू, क्रीडापे्रमींच्या वाढल्या होत्या तक्रारी
संकुलात येणारा एकही खेळाडू, क्रीडापे्रमी कार्यालयाच्या कारभाराबद्दल समाधानी नव्हता. करोडो रूपये खर्चूनही संकुलात साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नव्हत्या. अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे बीडकरांच्या मैदानाची वाट लागली. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही खुरपुडे मात्र सर्वसामान्यांकडून टक्केवारीने पैसे वसूल करण्यातच व्यस्त होती. मागील काही दिवसांपासून व्यक्तिगत खुरपुडे व कार्यालयाबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. त्या वरिष्ठांपर्यंत गेल्या होत्या.
आठ महिन्यांपूर्वी बस्सीला बेड्या
व्यायामशाळा व युवक कल्याण शिबिराचे मंजुर केलेले अनुदान व व्यायामशाळेचे प्रस्ताव मंजुर करण्यासाठी १० हजार रूपयांची लाच घेताना २८ जुलै २०१७ रोजी क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी याला एसबीने रंगेहाथ पकडले होते. बस्सीने टक्केवारी प्रमाणे ९८ हजार रूपयांची लाच मागितली होती. पैकी १० हजार रूपये स्वीकारताना पकडले होते. विशेष म्हणजे त्यापूर्वी त्याचे दोन वेळेस निलंबनही झाले होते.
चोराच्या उलट्या...
बीडमधील जनता उद्धट बोलते, ‘चांगल्या’ कामास सहकार्य करीत नाहीत. महिला अधिकारी असल्याचा फायदा घेऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, यासारखे अनेक आरोप करुन नंदा खुरपुडे हिने बीडच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न क्रीडा आयुक्तांपुढे केला होता. परंतु केंद्रेकरांना बीडचा अनुभव असल्याने त्यांनी खुरपुडेलाच धारेवर धरले होते.
लातूरहून बघायची कारभार
खुरपुडे ही मूळची लातूरची रहिवासी आहे. रोज बीडला ती ये-जा करीत असे. उशिरा येणे आणि लवकर निघून जाणे, असा तिचा मनमानी कारभार सुरू होता. लातूरहूनच ती बीडचा कारभार बघत होती. याबाबत काही लोकांनी तक्रारी केल्या, परंतु तिला याचा फरक पडला नाही. तक्रारी करणाºयांनाच ती अरेरावीची भाषा वापरत असल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ अधिकाºयांपुढे भावनिकतेचे भांडवल
२१ डिसेंबर २०१७ रोजी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाला भेट दिली. यावेळी क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी त्यांच्यासमोर तकारींचा पाढाच वाचवून दाखविला. तसेच कार्यालयाची दुरवस्था व असुविधा पाहून त्यांनी नंदा खुरपुडे हिला चांगलेच धारेवर धरले होते. आपली चूक झाकण्यासाठी खुरपुडे ही केंद्रेकरांसमोर रडली होती. महिला अधिकारी रडल्याने केंद्रेकरांनी थोडे शांततेत घेतले होते. वरिष्ठांना अशा प्रकारे अनेक वेळा ‘भावनिक होऊन’ खुरपुडे ही वेळ मारून नेत होती.
दुर्लक्षामुळे ‘लॉन’ खराब
३० लाख रूपये खर्च करून संकुलात लॉन लावण्यात आले. परंतु केवळ देखभालीअभावी ते खराब झाले. लॉनवर पाणी मारण्यासाठी आलेले साहित्यही खुरपुडे हिने परस्पर विक्री केल्याचा आरोप क्रीडाप्रेमींनी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यापुढे केला होता. याचे उत्तर देताना खुरपुडे घामाघूम झाली होती. केवळ देखभालीअभावी संपूर्ण कार्यालयाचा ‘खेळ’ बिघडला आहे.