बीड क्रीडा कार्यालयाचा ‘खेळ’ बिघडला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:00 AM2017-11-20T01:00:16+5:302017-11-20T01:00:24+5:30
बीड : येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात मागील काही महिन्यांपासून कारभार ढेपाळला आहे. संकुलाच्या दुरवस्थेबरोबरच जागा व रस्ते हडप करणा-यांना ...
बीड : येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात मागील काही महिन्यांपासून कारभार ढेपाळला आहे. संकुलाच्या दुरवस्थेबरोबरच जागा व रस्ते हडप करणा-यांना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस हा ‘खेळ’ बिघडत चालला आहे. अधिकारी मात्र मनमानी कारभार करण्यात व्यस्त आहेत. याचा फटका कार्यालयाच्या प्रतिमेवर होत असून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
६० लाख रूपये खर्चून संकुलाचा चेहरामोहरा बदलण्यात आला. परंतु केवळ जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या संकुलाची दुरवस्था झाली. त्यामुळे येथे खेळणे तर दुरच साधेही चालणे मुश्किल बनले आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील ढिसाळ नियोजन सध्या सर्वसामान्यांसह क्रीडा प्रेमी, खेळाडूंसाठी तोट्याचे ठरत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जलतरण तलावाच्या बाजूच्या रस्त्यावर अनिल डायगव्हाने नामक व्यक्तीने हॉटेल उभारून अतिक्रमण केले आहे. या हॉटेलच्या माध्यमातून संबंधितांनी लाखोंची कमाई केली. गैरकामांसाठी येथील अधिकारी चक्क टक्केवारीने पैसे घेतात, हे एसीबीच्या जाळ्यात सापडलेल्या नानकसिंग बस्सी यांनी दाखवूनही दिले होते. विशेष म्हणजे टक्केवारीने पैसे जमा करणाºया बस्सी यांची जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी एका पत्राद्वारे पाठराखनही केली होती.
वरिष्ठांकडून आपल्याला ‘पाठबळ’ मिळत असल्याचे समजताच बस्सींनी क्रीडा संकुलाची दुरवस्था करून ठेवली. विशेष म्हणजे अतिक्रमणाचे प्रकरणही बस्सी यांच्याकडेच होते. त्यांनीच याप्रकरणाकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष केले. याचा फटका खेळाडूंसह संकुलात येणाºया क्रीडा प्रेमींना सहन करावा लागत आहे.
या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्याशी भ्रमणध्वणीवरून संपर्क केला, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे भ्रमणध्वणी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.
डीएसओंची चौकशी करा
जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांची कारकिर्दही वादग्रस्त आहे. तसेच बीडमध्येही त्यांनी विकासात्मक कामे करण्यास उदासिनता आहे. विकासात्मक कामे करण्याऐवजी गैरप्रकारांची पाठराखन खुरपुडे करीत आहेत. त्यांचीच चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे.