महिला वाहकाने वाजवली एसीबीची बेल; एसटीच्या वाहतूक नियंत्रकाला जेल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 12:00 PM2022-12-17T12:00:48+5:302022-12-17T12:01:20+5:30
एक लाख २० हजारांची मागणी केली असता पहिल्या टप्प्यातील ३० हजार स्वीकारताना पकडले रंगेहाथ
बीड : अनियमिततेप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत बडतर्फ न करण्यासाठी व कर्तव्यावर परत घेण्याकरिता वरिष्ठांना बोलून मदत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रकाने महिला वाहकाकडे एक लाख २० हजार रुपयांची मागणी केली. महिला वाहकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्यावर सापळा रचून ३० हजार रुपये स्वीकारताना नियंत्रकाला रंगेहाथ पकडले. ही कारवाई १६ डिसेंबर रोजी दुपारी बसस्थानकातील कार्यालयात घडली.
किशोर अर्जुन जगदाळे (वय ४०) असे त्या वाहतूक नियंत्रकाचे नाव आहे. ३६ वर्षीय महिला तक्रारदार बीड आगारात बसवाहक आहे. अनियमिततेचा ठपका ठेवून त्यांची चौकशी लावण्यात आली आहे. या चौकशीनंतर त्यांना बडतर्फ न करण्यासाठी व वरिष्ठांना बोलून कर्तव्यावर रुजू करून घेण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची मागणी वाहतूक नियंत्रक किशोर जगदाळे याने केली होती. टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे होते. मात्र, महिला वाहकाने एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार दिली, त्यानंतर १५ डिसेंबरला लाच मागणी पडताळणी केली. यानंतर १६ रोजी दुपारी पहिल्या हप्त्याचे ३० हजार रुपये स्वीकारताना किशोर जगदाळे यास रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक शंकर शिंदे, पो. नि. रवींद्र परदेशी, अमोल धस, अंमलदार श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, भारत गारदे, अविनाश गवळी, चालक गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली आहे.
आधी बसस्थानकासमोर, नंतर कार्यालयात बोलावले
लाच देण्यासाठी वाहतूक नियंत्रक किशोर जगदाळेने महिला वाहकास हप्त्याची रक्कम ठरवून दिली होती. पहिल्या हप्त्याचे ३० हजार रुपये देण्यासाठी महिला वाहकास आधी बसस्थानकासमोर बोलावले, त्यानंतर कार्यालयात बोलावले. लाचेची रक्कम स्वीकारताच त्यास एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप मारुन पकडले.