गेवराईत प्रस्थापितांच्या विरोधात लाडक्या बहिणी मैदानात; पवार, पंडितांची गणिते बिघडवणार

By सोमनाथ खताळ | Published: November 6, 2024 06:56 PM2024-11-06T18:56:39+5:302024-11-06T18:58:39+5:30

गेवराई मतदारसंघात १९६२ पासून आतापर्यंत पंडित आणि पवार कुटुंबातीलच आमदार झालेले आहेत. यात त्यांना मंत्रिपदेही मिळाली.

Beloved Sisters Pooja More, Mayuri Khedkar, Priyanka Khedkar Field Against Georai's Established leaders Pawar, Pandit | गेवराईत प्रस्थापितांच्या विरोधात लाडक्या बहिणी मैदानात; पवार, पंडितांची गणिते बिघडवणार

गेवराईत प्रस्थापितांच्या विरोधात लाडक्या बहिणी मैदानात; पवार, पंडितांची गणिते बिघडवणार

बीड : गेवराई विधानसभा मतदारसंघात पवार, पंडित या प्रस्थापितांच्या विरोधात आता लाडक्या बहिणीही मैदानात उतरल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरत या महिला उमेदवार पवार, पंडितांच्या मतांची गणिते बिघडवणार असल्याचे दिसत आहे. यात मराठा कार्ड म्हणूनही तिसऱ्या आघाडीकडून पूजा मोरे या मैदानात आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होऊ पाहत आहे.

गेवराई मतदारसंघात १९६२ पासून आतापर्यंत पंडित आणि पवार कुटुंबातीलच आमदार झालेले आहेत. यात त्यांना मंत्रिपदेही मिळाली. परंतु गेवराई मतदारसंघात अद्यापही मोठा असा कोणताच प्रकल्प आलेला नाही. वर्षानुवर्षे तेच ते उमेदवार उभे राहतात आणि पवार व पंडित कुटुंबातीलच आमदार होतो. परंतु यावेळी या प्रस्थापितांच्या विरोधात महिलांनीही बाण ताणला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पार्टीच्यावतीने पूजा मोरे, मनसेकडून मयुरी खेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रियंका खेडकर मैदानात आहेत. तिघी महिला उमेदवारांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच मतदारसंघ पिंजून काढला आहे. आता या विस्थापित महिला उमेदवरांचे प्रस्थापित असलेल्या पंडित व पवारांना आव्हान असणार आहे. आता या लाडक्या बहिणी मतांची बेरीज जुळवून कसे आव्हान देतात, याकडेही लक्ष लागले आहे.

या विषयांची गेवराईत चर्चा
गेवराई मतदारसंघातील गुन्हेगारी, अवैध वाळू वाहतूक, शासकीय कामांतील भ्रष्टाचार हेच विषय सध्या चर्चेत आणले जात आहेत. पवार, पंडितांच्या विरोधात लाडक्या बहिणींकडून आरोपही केले जात आहेत. मतदार मात्र आता याचा कसा विचार करतात? हे निकालानंतर समजेल.

मराठा कार्ड म्हणून मोरेंचे आव्हान
गेवराई मतदारसंघातील प्रस्थापित असलेले आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित, महायुतीचे विजयसिंह पंडित आणि अपक्ष लक्ष्मण पवार हे मराठा आहेत. आता त्यांच्याविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पार्टीच्या पूजा मोरे रिंगणात आहेत. मराठा आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सक्रिय असल्याने त्यांच्याकडून पवार, पंडितांच्या मतांची गणिते बिघडवली जाऊ शकतात. तर दुसऱ्या दोन्ही महिला उमेदवार या ओबीसी म्हणून रिंगणात उतरल्या आहेत.

२१ उमेदवार रिंगणात
गेवराई मतदारसंघात ४९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील तिघांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर सोमवारी अखेरच्या दिवशी २५ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता २१ उमेदवार हे रिंगणात आहेत. यातील ३ महिला आहेत तर १८ पुरुष आहेत.

Web Title: Beloved Sisters Pooja More, Mayuri Khedkar, Priyanka Khedkar Field Against Georai's Established leaders Pawar, Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.