शिक्षणाचे नाते मातीशी जोडण्याचा उत्तम प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:25 AM2019-06-24T00:25:05+5:302019-06-24T00:25:31+5:30
आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यात भारतीय भाषा, संस्कृती, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा समग्र विचार करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले.
भा.शि.प्र.संस्थेच्या स्वा.सावरकर महाविद्यालयात विद्यासभेच्या वतीने शनिवारी विद्वत परिषदेत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
व्यासपीठावर भाशिप्रचे कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, डॉ.हेमंत वैद्य, वसंतराव देशमुख, विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. रांजनीकर, गणेश अग्निहोत्री, प्रकाश जोशी यांची उपस्थिती होती.
डॉ. सावजी म्हणाले, शिक्षणाचा खरा उद्देश माणूस घडवणे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात समग्र समाजाचा विचार केला आहे. आंतर शाखीय शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. परीक्षा पद्धतीत बदल सुचिवले आहेत. शिक्षणातून रोजगाराचा विचार केल्याचे ते म्हणाले. तर ब्रिटिशांची शिक्षण पद्धत बदलणार आहे. गरजा लक्षात घेऊन मांडणी केल्याचे डॉ. सुहास पाठक म्हणाले. डॉ. रांजनीकर म्हणाले, आयोगाचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारतीयत्वाचा विचार केला आहे. क्रीडा व कलेला प्रोत्साहन दिले आहे. किरण भावठणकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्टये सांगितली.कार्यवाह नितीन शेटे म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात अनेक समाजोपयोगी बदल आहेत. यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. नवी पिढी घडविणारे हे धोरण आहे. भाशिप्र्र संस्था आपला अजेंडा तयार करणार असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रकाश जोशी यांनी केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या परिसंवादाला केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुमंत दुबे, आर. आर. कुलकर्णी, बाबुराव आडे, विष्णु सोनवणे, विजय चाटूफळे,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, विद्यासभेचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विविध संस्थाचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.