बर्ड फ्ल्यूमुळे खबरदारी; आष्टी तालुक्यात पशुसंवर्धनची सात पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:35 PM2021-01-14T13:35:58+5:302021-01-14T13:38:15+5:30
आष्टी तालुक्यात 19 व्या पशुगणणेनुसार 3 लाख 66 हजार 581 एवढी कोंबड्यांची संख्या आहे.
कडा ( बीड ) : आठ दिवसांपूर्वी तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तालुक्यातील ब्रम्हगांव व शिरापुर येथे देखील शेकडो कोबड्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तैनात केली आहेत. तालुक्यात पक्षी अथवा कोंबड्यांचा मृत्यू झाला तर याची माहिती कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आष्टी तालुक्यात 19 व्या पशु गणणेनुसार 3 लाख 66 हजार 581 एवढी कोंबड्याची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले आहेत. लाखो रुपयांची गुतवणुक करून उभा केलेल्या या व्यवसायाला आता कठिण दिवस आलेत. आठ दिवसापासुन शेजारील तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने कावळ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही एक पक्षी मृत आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बारा गावे कंटेनमेन्ट झोन घोषित केले. याच धर्तीवर अशा घटना कुठे घडल्या की लगेच पाहणी व निदानासाठी पंचनामा करून पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर आहेत. पक्षी अथवा कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास घाबरून न जाता पशुसंर्वधन विभागाला कळवावे असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी केले आहे.