सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:04+5:302021-08-27T04:36:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी शरीराला पुरेशी झोप आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. कमी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी शरीराला पुरेशी झोप आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. कमी झोप झाल्यास प्रतिकारशक्ती कमी होऊन चिडचिडेपणा, तणाव वाढत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले. नोकरदार, व्यावसायिक, अभ्यासू विद्यार्थ्यांना पुरेशी झोप होत नसल्याने त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. असेच रुग्ण मानसिक आरोग्य केंद्रात सध्या उपचारासाठी येत असल्याचेही सांगण्यात आले.
...
किमान सात तास झोप आवश्यक
मेडिकल तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २४ तासांत ७ ते ९ तास झोप आवश्यक आहे. दिवसात आपण कधीही झोप घेऊ शकतो. झाेप पूर्ण झाल्यास मानसिकता चांगली राहते. प्रतिकारशक्ती वाढण्यासह तणाव कमी होतो. चिडचिडेपणाला आळा बसतो. त्यामुळे झोप आवश्यक आहे.
...
संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक
जंकफूड, चायनीज अथवा इतर जास्त तळलेले पदार्थ खाऊ नयेत. यामुळे प्रोटिनचे प्रमाण कमी होते. जेवणात बी १२, बी ६, व्हिटॅमिन सी हे थेट रोगप्रतिकारशक्तीस जोडलेले असतात. हे घेण्यासाठी संतुलित आहार घ्यावा.
...
अपुऱ्या झोपेचे तोटे
शरीराला झोप कमी झाली की, स्टेरॉइड हाॅर्मोन्स वाढतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
जे लोक नियमित झोप घेत नाहीत. त्यांना घशात खरखर होणे, थंडी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसतात.
साधारण तिसऱ्या दिवसानंतर अशी लक्षणे जाणवू लागतात. शिंक येण्याचे प्रमाणही वाढते.
...
रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
योग्य आणि पौष्टिक आहाराला व्यायामाची जोड दिल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. तसेच शरीराला झोपही तेवढीच महत्त्वाची आहे. आपली रोगप्रतिकारशक्ती ही शरीराची ढाल आहे. मानसिकता, तणावमुक्त वातावरण असल्यास शरीरही आजारमुक्त राहते. तसेच नियमित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे.
...
होय, झोप महत्त्वाचीच...
रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी २४ तासांत ७ ते ९ तास झोप शरीराला आवश्यक आहे. यामुळे मानसिकता चांगली राहते. तणावमुक्त राहून चिडचिडेपणा होत नाही. झोप न झाल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळते.
- डॉ. मोहंमद मुजाहेद, मानसाेपचारतज्ज्ञ, बीड