भगीरथ बियाणींच्या मृत्यूचे गूढ; पिस्तूल साफ करताना चुकून गोळी झाडल्याचा कुटुंबीयांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:12 PM2022-10-13T13:12:57+5:302022-10-13T13:13:56+5:30

सकाळी झोपेतून उठल्यावर भगीरथ बियाणी हे योगा-प्राणायाम करत, त्यानंतर देवपूजा केल्यावर खोली बंद करून पिस्तूल साफ करत.

Bhagirath Biyani's death remains a mystery; The family speculated that the pistol was accidentally fired while cleaning it | भगीरथ बियाणींच्या मृत्यूचे गूढ; पिस्तूल साफ करताना चुकून गोळी झाडल्याचा कुटुंबीयांचा अंदाज

भगीरथ बियाणींच्या मृत्यूचे गूढ; पिस्तूल साफ करताना चुकून गोळी झाडल्याचा कुटुंबीयांचा अंदाज

googlenewsNext

बीड : भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येचे गूढ कायम असतानाच १२ ऑक्टोबर रोजी त्यात नवा ट्विस्ट आला आहे. बियाणी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, बियाणी यांचा मोबाइल न्यायवैद्यक चाचणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला आहे.

भगीरथ बियाणी यांनी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास शहरातील विप्रनगर येथे निवासस्थानातील बाथरूममध्ये डोक्यात स्वत:कडील पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईट नोटही लिहिल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यांचे बंधू बाळकृष्ण बियाणी यांनी पेठ बीड ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यात त्यांनी कुटुंबीयांचा दिनक्रम नमूद केलेला आहे. तिघे बंधू रोज सकाळी ११ वाजेनंतर ऑइल मिलमध्ये एकत्रित येऊन व्यावसायिक चर्चा करत. सकाळी झोपेतून उठल्यावर भगीरथ बियाणी हे योगा-प्राणायाम करत, त्यानंतर देवपूजा केल्यावर खोली बंद करून पिस्तूल साफ करत. त्यामुळे पिस्तूल साफ करताना चुकून ट्रिगर दबून गोळी डोक्यात लागली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे हे तपास करत आहेत. दरम्यान, ११ ऑक्टोबरला मध्यरात्री अमरधाम स्मशानभूमीत भगीरथ बियाणी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, नातेवाईक व मित्रपरिवाराची उपस्थिती होती.

सर्व बाजूंनी तपास
बियाणी कुटुंबीय दु:खात असल्याने त्यांचे जबाब घेता आलेले नाहीत. भगीरथ बियाणी यांचे कोणाशी शत्रुत्व नव्हते, अशी माहिती आहे. मात्र, मोबाइल कॉल्स, कथित मारहाण प्रकरण या बाबीदेखील पडताळल्या जात आहेत. सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

आमदार श्रीकांत भारतीय एसपींच्या भेटीला
दरम्यान, आमदार श्रीकांत भारतीय यांनी १२ ऑक्टोबरला भगीरथ बियाणी यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व पदाधिकारी सोबत होते.

Web Title: Bhagirath Biyani's death remains a mystery; The family speculated that the pistol was accidentally fired while cleaning it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.