बीड जिल्ह्यात मंदिराच्या दानपेटीत बाद नोटांची ‘भक्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:27 AM2018-08-13T11:27:33+5:302018-08-13T11:29:19+5:30
पाचशे , एक हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष झाले आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नोटांचे काय करायचे? एका भक्ताने त्यावर चक्क दानपेटीचा पर्याय निवडला.
शिरूरकासार ( बीड) : पाचशे , एक हजाराच्या नोटा बंद होऊन वर्ष झाले आहे. तरीही शिल्लक राहिलेल्या नोटांचे काय करायचे? एका भक्ताने त्यावर चक्क दानपेटीचा पर्याय निवडला. रविवारी येथील कालिकादेवीची दानपेटी विश्वस्त व समाजबांधवाच्या उपस्थितीत उघडली असता त्यात चलनातून बंद झालेल्या पाचशे रुपयांच्या तब्बल २१ नोटा निघाल्या. परिसरात दिवसभर या बाद नोटांच्या भक्तीचीच चर्चा होती.
कालिकादेवी हे परिसरातील एक जाज्वल्य देवस्थान असल्याने येथे दूरदूरहून भाविक दर्शनाला येतात. भाविक त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर केलेल्या नवसाप्रमाणे दानही देतात. याशिवाय मंदिरात दानपेटीत मोठ्या स्वरूपात देणगी दिली जाते. ही दानपेटी पंच व समाज बांधवांच्या उपस्थितीत उघडून रकमेची मोजदाद केली जाते. रविवारी ही दानपेटी उघडली असता पाचशे रुपयांच्या २१ नोटा म्हणजेच १० हजार ५०० रुपये आढळून आले. दानपेटीत सर्वांसमक्ष निघालेल्या या नोटांची रीतसर नोंद घेतली असून, त्यांच्या नंबरचीदेखील नोंद दानपेटी पंचनामा वहीवर केल्याचे संस्थानचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सांगितले.