सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्रभर ‘भंडारा’ उधळणार; यशवंत सेनेच्या भारत सोन्नर यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:13 PM2018-11-27T16:13:00+5:302018-11-27T16:14:39+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणाचा या सरकारला विसर पडला आहे. दिलेला शब्दही हे सरकार पाळत नाही. हे सरकार फसवे आहे.
बीड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा या सरकारला विसर पडला आहे. दिलेला शब्दही हे सरकार पाळत नाही. हे सरकार फसवे आहे. आता संयम संपला आहे. या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर भंडारा उधळून निषेध केला जाईल. यासाठी व्यापक आंदोलन करण्याचा इशारा यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी दिला आहे. आज कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी सरकारवर कडाडून टिका केली.
धनगर आरक्षणाचा प्रश्न आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये सोडविण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली बारामती येथे दिले होते. मला अरक्षणाचा अभ्यास झाला आहे? असे लेखी अश्वासन त्यांनी समाजबांधवांना दिले होते. परंतु सत्ता येऊन चार वर्षे उलटले तरी अद्याप धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियूक्त केलेल्या ‘टीस’ या संस्थेने अहवाल सादर केला. तरीही यावर ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात धनगर आरक्षण अहवाल पटलावर मांडण्यात यावा व अरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा, धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास आता धनगर समाज स्वस्त बसणार नाही. या सरकारला जागा दाखविण्यासाठी राज्यभर यशंवत सेनेच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा भारत सोन्नर यांनी दिला आहे. या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनाची तयारी केली जात असल्याचेही सोन्नर यांनी स्पष्ट केले.