भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:12+5:302021-03-26T04:34:12+5:30
बीड : शहराच्या बाहेर मांजरसुंब्याकडे असलेल्या बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ...
बीड : शहराच्या बाहेर मांजरसुंब्याकडे असलेल्या बायपासवरील छत्रपती संभाजी महाराज चौकात भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. ही घटना २४ मार्च रोजी मध्यरात्री घडली. दरम्यान, अपघात झाल्यानंतर याची माहिती व जखमींना उपचारासाठी घेऊन न जाता पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवनाथ छत्रभुज लवासे (१९, रा.तालखेड ता. माजलगाव), ज्ञानेश्वर प्रल्हाद तौर (२७, रा. खाडेवाडी ता.माजलगाव) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. ते दोघे दुचाकीवरुन (क्र.एमएच २० ईयू-६९०१) बीडच्या बाहेरून मांजरसुंब्याकडे जाणाऱ्या बायपासवरून जात होते. यावेळी छत्रपती संभाजी चौकात त्यांच्या पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (क्र.एमएच २३ ई-९८९९) दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही खाली कोसळले. अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली व अपघाताची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान दोघांनाही १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर तौर हा जागीच ठार झाला तर नवनाथ लवासे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीला धडकून कारचालक अमित वनवे (रा. चाणक्यपुरी ता.बीड) याने बार्शी रोडमार्गे बीड शहराकडे पोबारा केला होता. मात्र, गस्तीवर असलेले पेठ बीड ठाण्याचे पोलीस अंमलदार कलीम इनामदार व सिध्दार्थ घोडके यांना अपघातातील कार असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कारचालकास ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले असून, उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अमित वनवे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना.जयसिंग वाघ करत आहेत.
===Photopath===
250321\252_bed_17_25032021_14.jpg
===Caption===
अपघातातील दुचाकी व चारचाकी