भरधाव टेम्पोची बैलगाडीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:03+5:302021-04-19T04:31:03+5:30
धारूर : कुप्पा येथून तेलगाव येथील लोकनेते ...
धारूर
: कुप्पा येथून तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यास ऊस घेऊन येणाऱ्या बैलगाडीला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बैल जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी तेलगाव बीड महामार्गावर लोनवळ फाट्याजवळ घडली. या अपघातात ऊसतोड मजूर पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्यास बैलगाडीने ऊस वाहतूक करणारे ऊसतोड मजूर रामेश्वर साहेबराव वारे हे पत्नी किस्किंदा हिच्यासह नेहमीप्रमाणे रविवारी दुपारी कुप्पा येथील ऊस बागायतदार शेतकरी चंद्रकला किशन काळे यांच्या शेतातून ऊसतोडणी करून आपल्या बैलगाडीद्वारे तेलगाव येथे साखर कारखान्याकडे वाहतूक करीत होते. दरम्यान, लोनवळ फाट्याजवळ तेलगावकडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने (क्र.एम.एच.१३ आर ३५८०) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात एक बैल जागीच ठार झाला, तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला. तसेच ऊसतोड मजूर रामेश्वर वारे व त्यांच्या पत्नी किस्किंदा दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना माजलगाव येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बैलगाडीला धडक देणाऱ्या टेम्पोमधून विद्युत ट्रान्सफाॅर्मर वाहतूक केली जात होती. उदगीर येथील अमित इलेक्ट्रिकल्सचे ठेकेदार केदार पाटील यांचे वीज ट्रान्सफाॅर्मर टेम्पोत असल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले. टेम्पोचालकाचे नाव शेख जिलानी असून त्यास वडवणी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच ऊसतोड संघटनेचे कृष्णा तिडके यांनी घटनास्थळी भेट देऊन ही माहिती दिल्यानंतर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी जखमी ऊसतोड मजूर पती-पत्नीची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संबंधित डाॅक्टरशी खा. मुंडे यांनी चर्चा केली.
फोटो ओळी : तेलगाव येथील सोळंके सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला. यात एक बैल जखमी, तर बैलगाडीतील ऊसतोड मजूर पती-पत्नी जखमी झाले. धडक देणारा टेम्पो वीज ट्रान्सफॉर्मरची वाहतूक करीत होता.
===Photopath===
180421\img-20210418-wa0162_14.jpg~180421\img-20210418-wa0163_14.jpg