बीडच्या घंटागाडीवरील ‘भोंगा’ वाजतोय राज्यभर ! पालिकेकडून जनजागृतीसाठीचे पुढचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 04:05 PM2018-09-07T16:05:02+5:302018-09-07T16:08:35+5:30
दोन वर्षांपूर्वी बीड नगर पालिकेने घंटागाडीवर भोंगा बसवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
बीड : दोन वर्षांपूर्वी बीड नगर पालिकेने घंटागाडीवर भोंगा बसवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल घेत नगर विकास विभागाच्या संचालक, उप सचिवांनी राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना घंटागाडीवर भोंगा बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीडचा ‘भोंगा’ राज्यभर वाजत असल्याचे दिसून येत आहे.
२०१६ साली भागवत जाधव या सफाई कामगाराने स्व-खर्चातून माळीवेस परिसरात एका घंटागाडीवर भोंगा बसविला. या माध्यमातून कचरा संकलनासह ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन केले गेले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी याची दखल घेत बीड पालिकेच्या सर्व घंटागाड्यांवर भोंगे बसविले. त्यानंतर नगर विकास विभागाची स्वच्छ महाराष्ट्र अभियानासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत नगरविकास विभागाचे उप सचिव सुधाकर बोबडे व राज्य संचालक उदय टेकाळे यांनी या भोंगासंदर्भात बीड पालिकेचे स्वागत केले. असेच भोंगे राज्यातील सर्व घंटागाड्यांवर बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या एका परिपत्रकात तसे लेखी आदेशही काढले. तेव्हापासून राज्यातील सर्व घंटागाड्यांवर जनजागृती करणारे भोंगे बसविण्यात आले आहेत.
बीड शहरात १२ ट्रॅक्टर व १५ रिक्षांवर हे भोंगे लावून जनजागृती केली जात आहे. भागवत जाधव यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला हा उपक्रम आज राज्यभर राबविला जात आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात जनजागृती करण्यासाठी भागवत जाधवसह स्वच्छता निरीक्षक व्ही. टी. तिडके, आर. एस. जोगदंड, भारत चांदणे, ज्योती ढाका, आर. व्ही. डहाळे हे परिश्रम घेत आहेत.