भूमिपुत्र प्रतिष्ठान व भेंड ग्रामस्थांकडून संघर्ष धान्य बँकेत आठ क्विंटल धान्य जमा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:31 AM2021-04-06T04:31:58+5:302021-04-06T04:31:58+5:30
गेवराई : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’, या संत वचनाप्रमाणे ...
गेवराई : ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’, या संत वचनाप्रमाणे भेंड खुर्द ग्रामस्थ व भूमिपुत्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष धान्य बँकेत आठ क्विंटल धान्य जमा करण्यात आले. भेंड खुर्द या गावात संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली होती. या जयंतीचे औचित्य साधून भूमिपुत्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांकडून संघर्ष धान्य बँकेसाठी धान्य जमा करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार भूमिपुत्र प्रतिष्ठान यांनी केलेल्या आवाहनाला सर्व ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्व ग्रामस्थांतर्फे आठ क्विंटल धान्य जमा करण्यात आले. ‘तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी’, या संत गाडगे महाराजांनी दिलेला संत वचनाचा वारसा जपत भूमिपुत्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी हे धान्य संघर्ष धान्य बँकेत जमा केले. गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष धान्य बँकेत अनेक दानशूर व्यक्ती एक किलोपासून शंभर किलोपर्यंत धान्य जमा करत आल्या आहेत. परंतु, भेंड खुर्द ग्रामस्थांनी आठ क्विंटल धान्य जमा करून दातृत्वाचा एक नवा इतिहास निर्माण केला आहे. कोरोनाच्या काळामध्ये गावातील धार्मिक उत्सव व इतर कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे अन्नदानामध्ये खंड पडू नये म्हणून ग्रामस्थांनी अनाथ, वंचितांसाठी हे धान्य पुरवले आहे. भेंड खुर्द येथील भूमिपुत्र प्रतिष्ठान हे गावातील सुशिक्षित तरुण, नोकरवर्ग, तरुण व सधन व्यक्ती एकत्र येऊन चालवत आहेत. या माध्यमातून गावातील शैक्षणिक प्रश्न, शेतीचे प्रश्न, सामाजिक प्रश्न सोडविण्याचे काम भूमिपुत्र प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. गावातील नोकरदार मंडळींचा यामध्ये विशेष हातभार असतो. तसेच कठीण प्रसंगात मदत करण्यासाठी गावातील नोकरदार मंडळी आपले एक महिन्याचे वेतन यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जमा करत आहेत. संपूर्ण भेंड खुर्दकडून हे धान्य आम्ही आपल्याकडे सुपूर्द करत आहोत, त्यामुळे कुणाचेही नाव यामध्ये येऊ नये, अशी विनंती गावातर्फे करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र प्रतिष्ठान व संघर्ष धान्य बँकेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गेवराईतील वृत्तपत्र वितरक कृष्णाजी सरोदे ऊर्फ तात्या यांना ५० किलो धान्याची मदत करण्यात आली. कृष्णा सरोदे हे जुन्या काळातील वृत्तपत्र विक्रेते असून, ते आता थकले आहेत. भूमिपुत्र प्रतिष्ठान व भेंड खुर्द गावाने दिलेल्या मदतीबद्दल कृष्णा सरोदे यांनी भेंड खुर्दमधील ग्रामस्थांचे आभार मानले.