बीडमध्ये पैशाचा पाऊस पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २० हजारांत लाख रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:36 AM2018-09-01T00:36:15+5:302018-09-01T00:36:37+5:30
सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लिंबू घ्या, कुंकू लावा, नदीला जाऊन या, पूजेसाठी तांदूळ घ्या...असे म्हणत मांत्रिकासह पाच जणांचा पैशाचा पाऊस पाडण्यासाठी डाव बसला. २० हजारांत लाख रुपये याप्रमाणे पैसे देण्याचे ठरले. हेच पोलिसांनी हेरले अन् त्यांचा डाव फसला. पैशाचा पाऊस पडून लाखो रुपये मिळवून देतो, असे म्हणणाºया टोळीचा बीडपोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. अंधश्रद्धेवर आजही लोकांचा विश्वास असल्याचे हे यावरुन स्पष्ट झाले.
बीड तालुक्यातील समनापूर येथील राजाभाऊ अंबादास गोरे (५५) हे सामान्य कुटुंबातील शेतकरी पत्नीसमवेत गोरे वस्तीवर वास्तव्य करतात. धार्मिकतेची आवड असल्याने ते १५ दिवसांपूर्वी आळंदीला गेले. तेथेच त्यांची टोळीतील सदस्य बाबासाहेब पोपट भोंडवे (४८, रा. पुणे) याच्यासोबत ओळख झाली. चार - दोन गोष्टी प्रेमाने बोलण्यात आल्या. याचवेळी भोंडवेने गोरे यांना आपल्या जाळ्यात ओढले. आपली पैशाचा पाऊस पाडून देणा-या महाराजांसोबत ओळख आहे. तुम्ही २० हजार रुपये दिल्यास एक लाख रुपयांच्या नोटा आकाशातून बरसतील हे गोरे यांना पटले. त्याप्रमाणे गोरे वस्तीवर येण्याचे ठरले. चार ते पाच वेळेस फोनाफोनीही झाली.
अखेर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता एका चारचाकी वाहनातून (एमएच १२ जीव्ही ६६६२) मधून बाबासाहेब पोपट भोंडवे (४८, रा. पुणे), भाऊसाहेब गोपाळ गिरी (४९, बिलोणी, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद), भगवान मेसू माने (६५, रा. पुणे), राहुल संजय वाळके (३०, रा. पुणे), देवेंद्र भाऊदास वैष्णव (२४, संगमनेर, अहमदनगर) हे वस्तीवर आले. रात्री १० वाजता त्यांचा पाऊस पाडण्यासाठी डाव बसला. लिंबू, हळद, कुंकू, तांदूळ, गोमूत्र असे विविध साहित्य समोर ठेवले अन् मंत्रोच्चार सुरु झाला. याचवेळी दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी छापा टाकत या सर्वांचा भांडाफोड केला. अचानक पडलेल्या धाडीनंतर या पाचही जणांना पळून जाण्यात अपयश आले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधकचे सपोनि गजानन जाधव, पो. ह. अभिमन्यू औताडे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, भारत बंड, राजाभाऊ नागरगोजे, राहुल शिंदे, महेश चव्हाण, नारायण साबळे यांनी केली.
अंधश्रद्धेवर आजही विश्वास
या घटनेवरुन अंधश्रद्धेवर आजही नागरिकांचा विश्वास आहे हे दिसून येते. प्रशासन व संघटनांकडून वारंवार जनजागृती होते. मात्र, अद्याप त्यावर निर्बंध घालण्यात यश मिळाले नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. नागरिकांनी अशा प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
भाऊसाहेब गिरी बनतो महाराज
भाऊसाहेब गिरी हा टोळीचा म्होरक्या आहे. महाराजाची वेशभूषा करुन तो पूजेसाठी बसतो. काहीतरी मंत्रोच्चार करुन समोरच्याला विधी सांगतो. इतर आरोपी समोर बसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. फसवणूक करण्याची त्यांची ही आयडिया आहे.
नदीत जाऊन केली पूजा
घरात पूजेला बसण्यापूर्वी पाचही आरोपी गोरे यांना घेऊन जवळीलच एका नदीवर गेले. तेथे काहीतरी विधी केला. आता घरी जाऊन पैशाचा पाऊस पाडायचा असे त्यांचे ठरले होते. घरची पूजा झाल्यानंतर ते पुन्हा नदीत जाणार होते आणि तेथूनच त्यांचा पलायन करण्याचा हेतू होता.
बीडच्याही तिघांना घेतले बोलावून
गोरे यांच्यासह बीड शहरातील आणखी तिघांना समनापूर येथे बोलावले होते.
एकामागोमाग एक अशी सर्वांची फसवणूक केली जाणार होती.
गोरे यांची पूजा सुरू असतानाच पोलिसांनी छापा मारला.
राज्यभर टोळीचे जाळ
भाऊसाहेब गिरी म्होरक्या असलेल्या या टोळीचे राज्यभर जाळे आहे. आतापर्यंत त्यांनी अनेकांना गंडवल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे. शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सावकाराच्या दाराची करा पूजा, अनमिळवा पैसा...!
पाऊस पडण्यापूर्वी गावातील सावकाराच्या दारात जाऊन हळदी, कुंकू वाहून त्याची पूजा करा. त्यानंतर घरी या. वाटीत तांदूळ घ्या. एका रेषेत तांदळाची रास लावा. प्रत्येक पाच मिनिटाला एक तांदूळ डाव्या हाताच्या करंगळीने ओढायचा. एक तांदूळ ओढला की सावकाराच्या घरातील १०० रुपयांची नोट तुमच्या घरात येईल. एका दिवसात किमान १ लाख रुपयेच येतील. तत्पूर्वी आम्हाला २० हजार रुपये देऊन खूष करावे लागेल. आम्ही गेल्यानंतर घरात शोध घ्यायचा. प्रत्येक कोप-यात तुम्हाला नोटा दिसतील. त्या तुम्ही एकत्रित करायच्या...अशी प्रलोभने या टोळीकडून दिली जात होती.