बीडमध्ये फेरफार नकलेसाठी अभिलेख कक्षात मोजावे लागतात पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:10 AM2018-07-12T00:10:47+5:302018-07-12T00:11:25+5:30
शेतक-यांना पीक कर्ज तसेच इतर आवश्यक कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. मात्र, तहसील कार्यालयातून फेरफार मिळविण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शेतक-यांना पीक कर्ज तसेच इतर आवश्यक कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. मात्र, तहसील कार्यालयातून फेरफार मिळविण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शिवाय तात्काळ नक्कल प्राप्त करण्यासाठी दलालामार्फत प्रत्येक नकलेसाठी १०० ते ५०० रूपये द्यावे लागत असल्याची माहिती या कामासाठी आलेल्या शेतक-यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्वच बँकामध्ये पीक कर्जासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे. आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. बॅँकाच्या वाढत्या जाचक अटी व शर्तींमुळे अनेक कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यासाठी शेतक-यांना संबंधित शासकीय कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. खेटे घालण्याबरोबरच काही अधिकारी कर्मचा-यांकडून शेतक-यांची आर्थिक लूट देखील केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. फेरफार नकलेसाठी रीतसर पद्धतीने अर्ज करून तेसच आवश्यक कागदपत्रे देऊन देखील नक्कल देण्यासाठी १०० ते ३०० रूपये घेतले जात आहेत. पीक कर्ज मिळण्याची मुदत पुढील काही दिवस शिल्लक असल्यामुळे फेरफार तात्काळ मिळवण्यासाठी पैसे देत आहेत. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय देखील उपलब्ध नाही.
फेरफारचे जुने दस्तावेज तलाठी कार्यालयाकडून तहसील कार्यालयात जमा केलेले असतात. त्यामुळे फेरफार नक्कल पाहिजे असेल तर अनेक शेतकºयांना तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यानंतर फेरफारची नक्कल देण्यात येते. काही शेतकºयांच्या म्हणण्याप्रमाणे काही महिन्यापूर्वी ५० रूपये घेतले जात होते. मात्र, मागील काही दिवसांपासून १०० ते ३०० रूपये घेतले जात आहेत. घेतलेल्या पैशाची पावती किंवा पुरावा दिला जात नाही. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांशी संपर्क केला असता दोघांचा संपर्क झाला नाही.
जिल्ह्यातील ११ तहसील कार्यालयांत फेरफार नक्कल मिळवण्यासाठी गर्दी पहायला मिळत आहे. येथे देखील अधिकारी कर्मचाºयांकडून पैसे उकळले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. कागदपत्रांसाठी जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. तहसील कार्यालयांमधील हे गैरप्रकार रोेखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी तसेच फेरफार नक्कल लवकरात लवकर मिळावी अशी शेतकºयांची मागणी आहे.
दलालामार्फत तात्काळ नक्कल
नक्कल मिळवण्यासाठी कार्यालयाबाहेर अनेक शेतकरी उभा आहेत. त्यामुळे अनेक वेळ रांगेमध्ये ताटकळत उभे राहवे लागत आहे.
यावेळी बाहेरच्या दलालांमार्फत नक्कल घेतली तर रांगेत उभे राहवे लागत नाही व वेळ देखील वाचतो.
त्यामुळे तहसील कार्यालयाबाहेर बसलेल्या काही ठराविक दलालांमार्फत फेरफार नक्कल तात्काळ मिळवून देण्यासठी शेतकºयांकडून ४०० ते ५०० रूपये घेतले जातात.
धक्कादायक बाब म्हणजे फेरफार नक्कल घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे न देता फक्त गट नंबर सांगितला तरी देखील दलालामार्फत फेरफार नक्कल तात्काळ उपलब्ध करून दिली जाते.
जुने दस्तावेज लवकर सापडेनात
तलाठी कार्यालयाकडून १९६० पासूनचे फेरफार दस्तावेज तहसील कार्यालयात जमा केलेले आहेत.
मात्र, या कार्यालयात कर्मचा-यांची अपुरी संख्या व अस्ताव्यस्त पडलेली कागदपत्रे यामुळे आवश्यक कागदपत्रे लवकर सापडत नाहीत.
अर्ज दिल्यापासून ५ ते १० दिवसांनी शेतक-यांना फेरफार नक्कल दिली जाते. त्यामुळे अनेक शेतकºयांना तहसील कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. यामुळे पैसा आणि वेळ नाहक खर्ची पडत आहे.