बीडमध्ये तूर खरेदी सुरु, पण ठेवणार कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:44 AM2018-02-05T00:44:59+5:302018-02-05T00:46:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीला प्रारंभ झाला असलातरी पहिले चार दिवस खरेदी केंद्रांवर शुकशुकाट जाणवला. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्के तूर खेदीची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडच्या केंद्रांवर आलेली तूर खरेदीनंतर कुठे ठेवायची असा प्रश्न आतापासूनच स्थानिक यंत्रणेला पडला आहे.
राज्यात नाफेडमार्फत आधारभूत दराने तूर खरेदीसाठी १५९ केंद्र सुरु केले. त्यापैकी सर्वाधिक १२ केंद्र बीड जिल्ह्यात आहेत. शासनाने हमीदर ५४५० निश्चित केलेला असून हेक्टरी मर्यादा ४.८८ ठरविण्यात आल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.
मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून बीड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, गेवराई, आष्टी, पाटोदा, केज, धारुर, वडवणी, शिरुर आणि कडा येथे खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मागील वर्षी खरेदी केलेल्या तुरीचे वाहतूक व इतर बिले देण्यास निधीच्या अडचणींमुळे विलंब होत असल्याने पहिल्या दिवशी १ फेब्रुवारी रोजी केवळ तीन केंद्र सुरु झाले. नंतर २ रोजी उर्वरित केंद्र सुरु करण्यासाठी हालचाली झाल्या. नाफेडमार्फत जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे निधी देण्यात येणार असल्याचे सांगून मार्केटिंग फेडरेशनने त्यांच्या पातळीवर निधीची पुर्तता करुन दिली. शेतकºयांच्या मालाचा विचार करता शनिवारी बारा केंद्रांवर तूर खरेदीसाठी केंद्र सज्ज झाले.
मागील वर्षी जिल्ह्यात विक्रमी ४ लाख ३८ हजार ३२६ क्विंटल तूर खरेदी झाली होती. अनेक अडचणींचा सामना यंत्रणेसह शेतकºयांना करावा लागला होता. तर खरेदी केलेली तूर शासनाच्या बीडसह इतर जिल्ह्यातील गोदामात साठवणूक करावी लागली. यंदा ३९ हजार ६९४ हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड झाल्याने व पाऊसपाणी चांगले असल्याने बंपर उत्पादन झाले आहे. आॅनलाईन नोंदणी व तातडीची पैशाची निकड यामुळे यंदा केंद्रांवर अडीच लाख क्विंटल तूर खरेदी होण्याचा अंदाज आहे.
सध्या जिल्ह्यात गोदाम उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे खरेदी केलेली तूर सांभाळण्याचा व साठवणुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. वखार महामंडळाकडे गोदाम उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे. त्यात लांब अंतराचे गोदाम खर्चिक ठरणार आहेत. त्यामुळे गोदामांची शोधाशोध करण्याची वेळ सरकारी यंत्रणेवर येऊन ठेपल्याचे चित्र दिसत आहे.
हेक्टरी मर्यादेचा फेरविचार करा
केंद्रांवर तूर आणणाºया शेतकºयांना सध्या हेक्टरी मर्यादा ४.८८ इतकी आहे. कृषी विभागाच्या पाहणी अहवालानुसार पीक कापणीचे २६४ प्रयोग घेण्यात येत आहेत.
आतापर्यंत २०० प्रयोग केल्याची माहिती आहे. उर्वरित ६४ प्रयोग झाल्यानंतर अंतीम अहवाल येणार आहे.
कृषी अहवाल तसेच वस्तुस्थिती लक्षात घेता मर्यादेबाबत फेरविचार केल्यास आधारभूत केंद्रावर तुरीची मोठी आवक होऊ शकते.
मर्यादा १० क्विंटलपर्यंत वाढविण्यात यावी
जिल्ह्यात सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था आणि पीक संरक्षणासाठी प्रभावी उपाय करणारे बहुतांश शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांनी पेरलेल्या तुरीचा उतारा हेक्टरी सात ते दहा क्विंटलपर्यंत मिळालेला आहे. त्यामुळे हेक्टरी मर्यादेत वाढ करुन ती ९- ते १० क्विंटल करावी अशी मागणी शेतकरी बाबुराव आडगाव, केशव नामदेव माने व अन्य शेतकºयांनी केली आहे.
उतारा वाढण्याची शक्यता
जिल्ह्यातील काही तालुके वगळता तुरीचा उतारा चांगला मिळालेला आहे. कृषी विभागाच्या अंतीम अहवालात एकरी उतारा वाढण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील प्रयोगात ४.८८ तर दुसºया टप्प्यात ५.१४ तर प्रशासन काय निर्णय घेत आहे याकडे लक्ष लागले आहे.
गोदामाबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला
या वर्षी तूर खरेदी अडीच लाख क्विंटल होण्याची शक्यता आहे. तूर खरेदीनंतर कुठे पाठवायची याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. बारदाना उपलब्ध आहे. यंत्रणा सज्ज आहे. गोदामाबाबत वखार महामंडळाच्या वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करुन एसएमएसप्रमाणे तूर खरेदी केंद्रांंवर आणावी.
- एस. के. पांडव
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड
एसएमएस मिळूनही तूर आणली नाही
पहिल्या चार दिवसात केंद्र सुरु करण्यासाठी तजवीज झाली. नोंदणी केलेल्या शेतकºयांना एसएमएस मिळाले परंतु, त्यांनी तूर खरेदी केंद्रावर आणली नाही. त्यामुळे संबंधितांना फोनद्वारे संपर्क करुन तूर आणण्याबात सांगण्यात येत आहे. एसएमएस पोहचलेल्या २६ पैकी चारच शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आणली होती. रक्कम वेळेवर मिळेल काय ? हेक्टरी मर्यादा कमी या कारणांमुळे शेतकरी संभ्रमात आहे.