मातामृत्यू प्रमाण कमी करण्यात बीड यशस्वी; मृत्यूदर १३ वरुन ३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:16 AM2019-09-22T00:16:56+5:302019-09-22T00:17:28+5:30
बीड जिल्ह्यात माता मृत्यूचा दर कमी करण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला येत असल्याचे दिसत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात माता मृत्यूचा दर कमी करण्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला येत असल्याचे दिसत आहे. २०१६-१७ साली माता मृत्यू दर १३ होता, तो आता ३ वर आला आहे. महिला गर्भवती राहिल्यापासून ते प्रसुतीनंतर सव्वा महिना होईपर्यंत तिची सर्व काळजी, तपासण्या आणि उपचार केले जात आहेत. मागील साडेतीन वर्षांत ३२ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद माता व बालसंगोपन विभागाकडे आहे.
महिला गर्भवती राहिल्यापासून ते प्रसुती झाल्यानंतर सव्वा महिन्यापर्यंत मृत्यू झाल्यास त्याची माता मृत्यू म्हणून नोंद घेतली जाते. मागील साडे तीन वर्षांत ३२ माता मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यू होताच ‘माता मृत्यू अन्वेषण समिती’कडून चौकशी केली जाते. मातेचा मृत्यू का झाला, कारणे काय? तिच्या तपासण्या झाल्या का, योग्य उपचार झाले का? आदींची माहिती घेतली जाते. यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा तपासण्यापेक्षा माता मृत्यूच्या कारणांवर अधिक भर दिला जातो. यात दिसणाऱ्या समस्यांवर अधिक काम करून माता मृत्यू कमी करण्याच्या उपाययोजना सुचविल्या जातात. हेच या समितीचे मुख्य काम आहे.
या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार, माता व बालसंगोपण अधिकारी डॉ.संजय कदम, वरिष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञ, मेडीकल महाविद्यालयातील स्त्री रोग विभागाचे प्राध्यापक यांचा समावेश असतो. तसेच उपचार करणारे डॉक्टर, काळजी घेणाºया परिचारीका यांच्याकडूनही माहिती घेतली जाते. त्यानंतर हे रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जातात. मिळालेल्या आकडेवारीवरून यात यश येत असल्याचे दिसत आहे.
देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक
आरोग्य विभागातील विश्वसनिय सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एक लाखामागे माता मृत्यू दर हे ६६ आहेत. देशात केरळ, तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. बीड जिल्ह्याचाही राज्यात पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. मात्र, आकडेवारी मिळू शकली नाही.
तक्रार आल्यास वेगळ्या समितीची स्थापना
माता मृत्यू झाल्यास नातेवाईकांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून तक्रार केल्यास याची चौकशी करण्यासाठी वेगळी समिती स्थापन केली जाते.
माता मृत्यू अन्वेषन समिती हलगर्जीपणाचा तपास करीत नाही. यासाठी वेगळी समिती काम करते.
माता मृत्यू दर कमी करण्यात यश येत आहे. साडेतीन वर्षात ३२ मृत्यू आहेत. अन्वेषण समितीकडून चौकशी करून हा दर कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व टिम वर्कमुळे हे सर्व यश मिळत आहे. हा दर आणखी कमी करून शुन्यावर आणण्याचा संकल्प आहे.
- डॉ.संजय कदम, माता व बालसंगोपन अधिकारी, बीड