बीडकरांचे आरोग्य धोक्यात; नाल्या तुंबल्या, कुंड्या तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:49 PM2018-04-09T23:49:05+5:302018-04-09T23:49:05+5:30

स्वच्छ व सुंदर बीड शहर असल्याचा गवगवा करणाऱ्या नगरपालिकेचा गलथान कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला आहे. शहराची पाहणी केली असता ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला. तसेच नाल्याही तुंबलेल्या आहेत. घाण पाणी अनेकांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. या अस्वच्छतेमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Bidkar's health risks; Nallah Tumblia, Kundya Tudumba | बीडकरांचे आरोग्य धोक्यात; नाल्या तुंबल्या, कुंड्या तुडुंब

बीडकरांचे आरोग्य धोक्यात; नाल्या तुंबल्या, कुंड्या तुडुंब

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : स्वच्छ व सुंदर बीड शहर असल्याचा गवगवा करणाऱ्या नगरपालिकेचा गलथान कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला आहे. शहराची पाहणी केली असता ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला. तसेच नाल्याही तुंबलेल्या आहेत. घाण पाणी अनेकांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. या अस्वच्छतेमुळे बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही नगरपालिका स्वच्छतेबाबत अनभिज्ञ असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शासनाकडून राबविले जाणारे स्वच्छ सर्वेक्षण बीड पालिकेने केवळ कागदावरच केल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण कडक पाऊले उचलल्याचा दावा नगर पालिकेने केला होता. याबाबत पालिकेच्या स्वच्छता विभागाने ठिकठिकाणी अधिकारी, कर्मचारी नियुक्त करुन शहरातील कचरा एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नही केले. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कठोर परिश्रम घेतले. शासनाकडून बीड शहर हागणदारीमुक्त झाल्याचे प्रमाणपत्रही मिळाले.

स्वच्छ भारत मिशनमध्ये यश संपादन केल्यानंतर पालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या कामााला लागली. देशातील चार हजार नगरपालिकांनी यात सहभाग नोंदवला. टॉप ५० मध्ये येण्यासाठी आपण उपाययोजना केल्याचा दावाही नगरपालिकेने केला आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने आठवडाभर बीड शहराची पाहणी केली. दिसलेल्या परिस्थितीवरुन पालिकेने केलेला दावा सपशेल फोल ठरल्याचे समोर आले.

डेंग्यूने घेतला होता बळी
बीड शहरातील बालेपीर भागामध्ये घाणीच्या साम्राज्यामुळे एका मुलाला डेंग्यू आजार जडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर राजकीय आरोप - प्रत्यारोपांना सुरुवात झाली. नगरपालिके विरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही दिवस स्वच्छता केला. परंतु आता पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहवयास मिळत आहे.

आता एकहाती सत्ता
नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर काकू-नाना आघाडी व राष्ट्रवादी अशी सत्ता होती. परंतु एमआयएमचे सदस्य राष्ट्रवादीकडे गेल्याने पालिकेत आता राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुतण्याला शह देत ही सत्ता स्थापन केली. एकहाती सत्ता असतानाही बीड शहरातील स्वच्छतेबाबत अद्याप कठोर पाऊले उचलल्याचे दिसून येत नाही.

नाल्यांची होईना सफाई
शहरात ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्या बनविल्या. परंतु वेळोवेळी सफाई होत नसल्याने त्या तुंबल्या आहेत. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. याचा त्रास पादचाºयासह नागरिकांना सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर काही भागात नाल्यातील पाणी अनेकांच्या घरात शिरल्याचेही सांगण्यात येते.

साथरोगांना निमंत्रण
घाणीचे साम्राज्य पसरल्याने जुलाब, उलटी, डेंग्यू, मलेरिया, ताप यासारख्या साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. वेळोवेळी धूर फवारणी होत नसल्याचा आरोपही आहे.

स्वच्छतेसाठी न.प.ची यंत्रणा
२ जेसीबी, १२ ट्रॅक्टर, ५२ सायकल घंटागाडी, १० अ‍ॅपे रिक्षा घंटागाडी, २५० मजूर, ९० ठिकाणी मोठ्या कुंड्या, ती उचलण्यासाठी दोन मोठी वाहने अशी यंत्रणा स्वच्छता विभागाकडे आहे.
ही यंत्रणा शहराच्या दृष्टिकोनातून खूपच अपुरी असल्याचे सांगण्यात येते. यंत्रणा वाढवून शहर स्वच्छ करण्यासाठी मात्र पालिका उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे.
गत दोन वर्षांपूर्वी पालिकेने रोजंदारीवर मजूर घेऊन शहर स्वच्छता केली होती.

जिल्हा रूग्णालय परिसरात रुग्णांचेच आरोग्य धोक्यात
जिल्हा रुग्णालय परिसरात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. सोबतच नातेवाईकही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालय नेहमी गजबजबलेले असते. याच रुग्णालयासमोर पालिकेने कचराकुंडी ठेवलेली आहे. परंतु काही नागरिक कचरा कुंडीत न टाकता बाहेरच टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतरही कुंडीत कचरा टाकण्यासाठी पालिका जनजागृती करीत नाही तसेच बाहेरचा कचरा उचलून कुंडीत टाकण्यासाठी कर्मचारी धजावत नसल्याचे समोर आले आहे. अशीच परिस्थिती सहयोगनगर भागातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील कचराकुंडीची आहे. सारडा नगरीसमोरील कुंडीतील कचराही वेळोवेळी उचला जात नसल्याच्या तक्रारी ऐकावयास येत आहेत.

टेंडरवरुन वाद
आघाडी व नगराध्यक्ष यांच्यात स्वच्छतेच्या टेंडरवरुन नेहमीच वाद झाल्याचे दिसून आले. आघाडीने नगराध्यक्षांवर वेगवेगळे आरोप केले, तर नगराध्यक्षांनी हे आरोप कशा प्रकारे खोटे आहेत याचा खुलासा केला. दोघांमध्ये मात्र स्वच्छतेचे टेंडर तसे राहिले आणि बीड शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली.

कक्षात टाकला कचरा
शहरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात २७ जुलै २०१७ रोजी कचरा टाकला. विभागीय आयुक्तांनी कचरा टाकणाºयांना नोटीसही बजावल्या आहेत. यावरुन पालिकेतील वाद कसे आहेत हे दिसून येते. याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त करीत शहरातील स्वच्छतेकडे तात्काळ लक्ष देऊन होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Bidkar's health risks; Nallah Tumblia, Kundya Tudumba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.