मोठी कारवाई! खडकत येथील ५ विनापरवाना कत्तलखाने जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:47 PM2024-03-09T12:47:23+5:302024-03-09T12:47:49+5:30
महसूल, ग्रामीण विकास आणि पोलिस पथकाची संयुक्त कारवाई
- नितीन कांबळे
कडा (बीड) - गेल्या अनेक वर्षांपासून कारवाया होऊन देखील प्रशासनाला न जुमानता विनापरवाना चालवले जाणारे खडकत येथील पाच कत्तलखाने अखेर जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई महसूल, ग्रामविकास विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळी दहा वाजेच्या दरम्यान केली.
आष्टी तालुक्यातील खडकत येथे पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांनी अनेक वेळा धाडी टाकल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर गोवंशीय मांस जप्त करत हजारो जनावरांची सुटकी केली. एकीकडे अनेकवेळा धाडसत्र सुरू असतानाही येथील कत्तलखाने बंद होत नव्हते. महसूल, ग्रामविकास विभागाने दिलेल्या नोटिसला या कत्तलखान्यांनी केराची टोपली दाखवली. प्रशासनाला न जुमानता येथे राजरोसपणे अवैधरीत्या कत्तलखाने सुरू होते. आखरे आज सकाळी या कत्तलखान्यांवर महसूल, ग्रामविकास विभागाने पोलिस बंदोबस्तात येथील पाच कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आली आहेत.
या कारवाई वेळी प्रभारी तहसीलदार बाळदत्त मोरे, ग्रामविकास विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. तर आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिदे, अन्य पोलिस कर्मचारी व दंगल नियंत्रक पथकातील जवान यांचा चोख बंदोबस्त येथे होता. दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांच्या मंगणीस यश आल्याने मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी समाधान व्यक्त केले आहे.