आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:29 AM2021-02-05T08:29:36+5:302021-02-05T08:29:36+5:30

बीड : काकू-नाना विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण ...

Big mine in front of MLAs | आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग

आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग

Next

बीड : काकू-नाना विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी एका नगरसेवकाने प्रवेश केल्यानंतर आज परत चार नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळे आमदारांच्या आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे.

सापत्न वागणूक मिळू लागल्याचे कारण सांगत काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर शुक्रवारी नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे आणि भैय्यासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रा. जगदीश काळे, दिलीप गोरे, दिनकर कदम, विलास बडगे, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, गणपत डोईफोडे, सादेक जमा, दादासाहेब मुंडे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आघाडीत उभी फूट पडली आहे. २० पैकी ८ नगरसेवकांनी आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे.

यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले, आघाडीचा भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. आम्ही जवळचा, लांबचा न पाहता विरोधी नगरसेवकांच्या वाॅर्डातसुद्धा कामे करून दाखवली आहेत, केवळ विकासकामांच्या मुद्द्यावरच आज या नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात मतदारांनीदेखील सावध भूमिका घेऊन विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. यावेळी चारही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

राजकारणात काम करताना आपल्या परंपरेत राहूनच काम करावे लागते. घरात मोठ्यांचा मान ठेवणे ही संस्कृती आहे. पदासाठी रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का, असा सवाल करत ३५ वर्षांपासून मी नगराध्यक्ष आहे. मलाही आमदारकीसाठी अडून बसता आले असते, पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या मोठ्यांचा मान राखायला हवा. अण्णांसारखे शांत, संयमी आणि कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारे नेतृत्व असल्याने मला पदाचा कधीही मोह पडला नाही. दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊ. चुका सुधारून मतदारांचा विश्वास संपादन करू, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

Web Title: Big mine in front of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.